नवी दिल्ली : सध्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (ENG vs SA) यांच्यामध्ये कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आजपासून खेळवला जात आहे. लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांना चांगलाच घाम फोडला. कगिसो रबाडाच्या (Kagiso Rabada) घातक गोलंदाजीच्या जोरावर आफ्रिकने यजमान संघाला १६५ धावांवर गुंडाळले. इंग्लंडला ४५ षटकांमध्ये केवळ १६५ धावा करता आल्या. आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने ५५ धावा देऊन सर्वाधिक ५ बळी पटकावले आणि क्रिकेटच्या पंढरीत इतिहास रचला.
१६५ धावांवर इंग्लिश संघ तंबूतदरम्यान, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली. संघाची धावसंख्या ५० देखील झाली नव्हती तर संघातील ३ प्रमुख फलंदाज तंबूत परतले होते. मात्र ओली पोपने शानदार ७३ धावांची खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यालाही खेळपट्टीवर जास्त वेळ टिकता आले नाही. रबाडाच्या आक्रमक माऱ्यासमोर इंग्लिश फलंदाज चितपट झाले. पोप व्यतिरिक्त कोणत्याच इंग्लिश फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. विशेष म्हणजे रबाडाने कसोटीतील एका डावात पाच वेळा ५ बळी पटकावण्याची किमया साधली आहे. तो आपल्या कसोटी कारकिर्दील ५३ वा कसोटी सामना खेळत आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक ५ बळी पटकावले तर ॲनरिक नॉर्तजे (३) आणि मार्को जानसेनला २ बळी घेण्यात यश आले. तत्पुर्वी, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून यजमान संघाला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले होते. रबाडाने आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत शानदार गोलंदाजी केली. लक्षणीय बाब म्हणजे शानदार फॉर्ममध्ये खेळत असलेल्या जॉनी बेयरस्टोला खातेही उघडता आले नाही. २७ वर्षीय रबाडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ४३२ बळी पटकावले आहेत, यामध्ये कसोटी क्रिकेटमधील २४८ बळींचा समावेश आहे.