India vs England 4rt Test ( Marathi News ) : पहिल्या कसोटीतील पराभवानतंर भारतीय संघाने दमदार पुनरागमन करताना इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे. आता चौथी कसोटी २३ फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवली जाणार आहे आणि इंग्लंडचा संघ मुसंडी मारण्यासाठी जोरदार प्रयत्नाला लागला आहे. चौथ्या कसोटीत विजय मिळवून इंग्लंडला काही करून मालिका बरोबरीत आणून आव्हान कायम राखायचे आहे आणि त्यासाठी आता कर्णधार बेन स्टोक्सने कंबर कसली आहे. चौथ्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने गोलंदाजी करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
रांची येथे भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी स्टोक्स गोलंदाजी करू शकतो आणि या वृत्तामुळे इंग्लंडच्या ढासळत चाललेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या आशांना मोठा बूस्ट मिळू शकतो. स्टोक्सने पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये गोलंदाजी केली नाही, कारण तो गेल्या वर्षी त्याच्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतून बरा होत आहे. गोलंदाज म्हणून त्याची अनुपस्थिती जाणवत आहे. स्टोक्सने गोलंदाजीला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या महत्त्वपूर्ण चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडला अधिक संतुलित इलेव्हन निवडता येईल.
"मी हो पण, म्हणत नाही आणि नाही पण... मी बऱ्याच गोष्टींबद्दल नेहमीच खूप आशावादी असतो. ही एक मोठी जोखीम नसल्यामुळे माझ्यावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी मी काय करायला हवे याबद्दल वैद्यकीय टीमशी मी चर्चा करतोय. मी सराव सत्रादरम्यान १०० टक्के गोलंदाजी केली आणि त्याने मी खूश आहे. मी प्रत्यक्ष सामन्यातही गोलंदाजी करू शकतो, असे मला वाटतेय, परंतु तो मुर्खपणाही ठरू शकतो,''असे तो म्हणाला.
जर स्टोक्सने स्वत:ला गोलंदाज म्हणून उपलब्ध करून दिले तर इंग्लंडकडे त्यांची इलेव्हन पूर्णपणे बदलण्याचा पर्याय आहे किंवा तो जेम्स अँडरसन आणि मार्क वुड या तीन खेळाडूंच्या वेगवान आक्रमणात सहभागी होऊ शकतो.
इंग्लंडचा कसोटी संघ - बेन स्टोक्स, रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस एटकिसन, जॉनी बेअरस्टो, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टली, ऑली पोप, जो रूट, मार्क वूड