कोलंबो : क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये खेळभावना सर्वात महत्वाची असते. पण जर एखाद्या खेळाडूने गैरवर्तन केले तर त्याच्यावर आयसीसी कारवाई करते. इंग्लंडचा कर्णधार जो रुट हा शांत स्वभावाचा असला तरी त्याला सामनाधिकाऱ्यांनी तंबी दिली आहे.
सध्या इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा संघ क्षेत्ररक्षण करत असताना हा प्रकार घडला आहे. श्रीलंकेची चांगली फलंदाजी सुरु होती. त्यावेळी मोईन अलीच्या 76व्या षटकातील एका चेंडूवर जिलरुवान परेराला नाबाद ठरवण्यात आले आणि त्यानंतर रुटने याबाबत नाराजी दर्शवली.
मैदानावरील पंच इरॅसमस यांनी परेराला नाबाद दिल्यावर रुटने मैदानात जोरजोरात पाय आपटायला सुरुवात केली. ही गोष्ट सामनाधिकाऱ्यांनी पाहिली. त्यांनी रुटला बोलावून घेतले आणि त्याला शिक्षा केली. आयसीसीच्या नियमानुसार रुटला एक डीमेरीट गुण देण्यात आला आहे. त्याचबरोबर त्याला यापुढे असे कृत्य करू नये, अशी तंबी रुटला देण्यात आली आहे.