Moeen Ali, England vs Pakistan: इंग्लंडच्या संघाने १७ वर्षांनंतर पाकिस्तानचा दौरा केला आणि मालिका जिंकत मोठे यशही नोंदवले. इंग्लिश संघाने पाकिस्तानला त्यांच्या घरच्या मैदानावर ७ सामन्यांच्या टी२० मालिकेत ४-३ असे पराभूत केले. ३-३ अशी मालिका बरोबरीत असताना शेवटचा सामना रविवारी लाहोरमध्ये खेळला गेला. त्यात इंग्लंडने पाकिस्तानचा धुव्वा उडवत ६७ धावांनी सामना जिंकला. क्रिकेटच्या मैदानावर तर पाकिस्तानी खेळाडूंना टीकेचा सामना करावा लागलाच. पण अखेरचा सामना जिंकून इंग्लंड संघाचे कर्णधारपद भूषवणारा फिरकी अष्टपैलू मोईन अली यानेही पाकिस्तानची जाहीरपणे लाज काढली.
--
मोईन अली काय म्हणाला...
सातव्या सामन्यातील पराभवानंतर म्हणजेच दौरा संपताच इंग्लिश कर्णधार मोईन अली पत्रकार परिषदेत म्हणाला, "संघासाठी केलेली सुरक्षा व्यवस्था अतिशय चांगली होती. आमच्या अपेक्षेपेक्षा आमची चांगली काळजी घेण्यात आली आणि व्यवस्था छान होती. खाण्या-पिण्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर लाहोरमध्ये माझी थोडी निराशा झाली. लाहोरमधील जेवण चांगले नव्हते. त्यापेक्षा कराचीमधले जेवण जास्त बरे होते. तरीही ठीक आहे. साहजिकच हे सर्व खरोखर चांगले झाले, परंतु मला काही गोष्टी थोड्या निराशाजनक आढळल्या."
शॉन टेटने गेल्या सामन्यानंतर काढली होती पाकिस्तानची अब्रू
नुकताच पाकिस्तानचा गोलंदाजी प्रशिक्षक शॉन टेट यानेही पत्रकार परिषदेत जाहीरपणे पाकिस्तान संघाचा अपमान केला होता. मालिकेतील सहावा सामना हरल्यानंतर शॉन टेटने पत्रकार परिषदेत पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली आणि म्हटले की, 'जेव्हा आम्ही वाईट पद्धतीने हरतो तेव्हा पाकिस्तानी संघ व्यवस्थापन मला पत्रकार परिषदेत पाठवतात.' हे ऐकताच मॉडरेटर लगेच मध्येच आला आणि माईक बंद केला. यानंतर मॉडरेटरने शॉन टेटला विचारले की, 'तो ठीक आहे का?' म्हणजेच पत्रकार परिषदेसाठी तुम्ही तयार आहात की नाही. यावर टेट 'हो' म्हणाला. पण त्याच्या विधानामुळे व्हायचा तो गदारोळ झालाच.