Ben Stokes England Squad, World Cup 2023: इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने बुधवारी यंदाच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. इंग्लंडच्या संघाने आपल्या संघातील खेळाडूंमध्ये काही बड्या नावांचा समावेश केला आहे. बेन स्टोक्सने निवृत्तीच्या निर्णयावरून माघार घेतल्यानंतर, त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. पण स्टार फलंदाज हॅरी ब्रूक आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर या दोघांना मात्र १५ सदस्यीय खेळाडूंच्या संघात संधी मिळालेली नाही.
बेन स्टोक्सने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे घेतल्याचे बुधवारी उघड झाले. पुढील महिन्यात न्यूझीलंड विरुद्धच्या चार सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी तो संघात परतला, त्यावरून हे स्पष्ट झाले. इंग्लंडचे निवडकर्ते ल्यूक राईट यांनी या वृत्ताची पुष्टी केली की न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी जे खेळाडू असतील तोच १५ जणांचा संघ सध्या तरी विश्वचषकासाठी कायम ठेवण्यात आला आहे.
इंग्लंडच्या मुख्य निवडकर्त्यांच्या स्पष्टीकरणानंतर आता एक गोष्ट स्पष्ट झाली की, हॅरी ब्रूक याला सध्या तरी विश्वचषकात सहभागी होण्याची संधी इंग्लंडने दिलेली नाही. राइटने असेही स्पष्ट केले की आर्चरचा केवळ प्रवासी राखीव खेळाडू म्हणून इंग्लंडच्या विश्वचषक योजनेत समावेश केला जाईल. "इंग्लंडकडे अनेक चांगले खेळाडू आहेत, पण तरीही १५ खेळाडूच निवडायचे असल्याने ज्यांना स्पर्धेला मुकावे लागेल, त्यांच्यासाठी हे थोडेसे कठीण ठरू शकते. पण सध्या आम्ही निवडलेला संघ हा सामर्थ्यवान आणि दमदार आहे," असे त्यांनी सांगितले.
यंदाच्या विश्वचषकासाठी प्रत्येक संघांना 5 सप्टेंबरपर्यंत त्यांचे तात्पुरते विश्वचषक संघ औपचारिकपणे जाहीर करण्याची संधी आहे. तर त्या सुरूवातीच्या संघात 28 सप्टेंबरपर्यंत आणखी बदल केले जाऊ शकतात. त्यामुळे सध्या असा संघ जाहीर करण्यात आला आहे.
विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडचा तात्पुरता संघ: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.