PAK vs ENG: पाकिस्तान क्रिकेटला दुसरा मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडच्या संघानं ऐनवेळी दौऱ्यातून माघार घेतलेली असताना आता इंग्लंड क्रिकेट बोर्डानंही ऑक्टोबरमधील नियोजित दौऱ्यातून माघार घेतली आहे. इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार नसल्याचं इंग्लंडकडून जाहीर करण्यात आलं आहे.
न्यूझीलंडचा पाक दौरा रद्द!; सुरक्षायंत्रणेवर विश्वास नसल्याने अखेरच्या क्षणी माघार
इंग्लंडचा संघ ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान दौऱ्यावर दोन टी-२० सामने खेळण्यासाठी जाणार होता. याशिवाय इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाचा देखील पाकिस्तान दौरा नियोजित होता. यात महिला संघ दोन टी-२० आणि तीन वनडे सामने खेळणार होता. पण इंग्लंडच्या महिला आणि पुरूष क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा रद्द करण्यात आल्याची घोषणा इंग्लंडच्या वेल्स क्रिकेट बोर्डाकडून करण्यात आली आहे.
"आम्हाला आमच्या खेळाडूंचं शारिरीक आणि मानसिक आरोग्य हिच प्राथमिकता आहे. सध्याच्या कठीण काळात यावर अधिक भर देणं गरजेचं देखील आहे. या भागात दौरा करण्यासाठी चिंतेचं वातावरण आहे आणि अशा वातावरणात खेळाडूंवर देखील दबाव निर्माण होतो. सध्या आमचे खेळाडू याआधीच कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे त्रासलेले आहेत. त्यात आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धा लक्षात घेता खेळाडूंच्या आरोग्याबाबत कोणतीही जोखीम आम्ही घेऊ इच्छित नाही", असं इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डातून सांगण्यात आलं आहे.
याआधी न्यूझीलंडच्या संघानं पाकिस्तान दौऱ्यावर असताना पहिला वनडे सामना सुरू होण्याआधीच सुरक्षेच्या कारणास्तव मायदेशी परतण्याचा निर्णय घेत पाकिस्तानला धक्का दिला होता. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या निर्णयावर पाकिस्तानकडून जोरदार टीका होत असतानाच आता इंग्लंडनंही दौऱ्यातून माघार घेत पाकची नाचक्की केली आहे.