नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यामध्ये सामना होणार म्हटलं की क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगत असतात. हा सामना पाहण्यासाठी दोन्हीही देशासह जगभरातील क्रिकेट चाहते उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहेत. मात्र अशातच इंग्लंडॲंण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कसोटी मालिका व्हावी अशी ऑफर दिली आहे. मात्र भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) या ऑफरला नकार दर्शवला आहे.
लक्षणीय बाब म्हणजे दोन्ही देशांमध्ये मागील 15 वर्षांपासून एकही कसोटी सामना झाला नाही. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याने भारताने पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर आजपर्यंत एकही कसोटी सामना खेळला गेला नाही.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिका आयोजित करण्याची ऑफर दिली आहे. खरं तर या मालिकेचे यजमानपद देखील इंग्लंड सांभाळणार आहे. मात्र बीसीसीआयने या चर्चांना पूर्णविराम देत अशी कोणतीच शक्यता नसल्याचे म्हटले. 'टेलिग्राफ' या ब्रिटीश वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, "इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष मार्टिन डार्लो यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी (PCB) सध्याच्या टी-20 मालिकेदरम्यान भविष्यात होणारी कसोटी मालिका इंग्लंडच्या धरतीवर व्हावी याबाबत चर्चा केली. यादरम्यानच ही ऑफर देण्यात आली."
BCCI ने दिला नकार
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या फायद्यासाठी ही ऑफर दिली आहे, मात्र बीसीसीआयने यावर सांगितले की, आगामी काही वर्षांत दोन्ही देशांमध्ये सामने होण्याची शक्यता नाही. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने मंगळवारी गोपनीयतेच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, "पहिली गोष्ट म्हणजे ईसीबीने भारत-पाकिस्तान कसोटी मालिकेबाबत पीसीबीशी बोलले आहे, जे थोडे विचित्र आहे. कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेचा निर्णय बीसीसीआय नाही तर सरकार घेईल. त्यामुळे सध्या तरी आम्ही केवळ बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्येच पाकिस्तानविरुद्ध खेळू."
2007 मध्ये खेळवली होती शेवटची मालिका
भारत आणि पाकिस्तान यांनी शेवटची द्विपक्षीय कसोटी मालिका 2012 मध्ये खेळली होती. ही मालिका मर्यादित षटकांची होती तर दोन्ही देशांमध्ये शेवटची कसोटी मालिका 2007 मध्ये खेळवण्यात आली होती. दोन्ही देशातील तणावाचे संबंध पाहता बीसीसीआयने द्विपक्षीय मालिकेला नकार दिला आहे.
Web Title: England Cricket board offered to host IND vs PAK Test series, BCCI declined
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.