अॅडिलेड कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला दणका देत WTC स्पर्धेतील नंबर वनचा ताज हिसकावून घेतला. त्यात आता इंग्लंडच्या संघानेही टीम इंडियाला धक्का दिला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतून आउट झालेल्या इंग्लंडनं टीम इंडियाचा मोठा रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
भारतीय मैदानात इतिहास रचणाऱ्या न्यूझीलंडवर ओढावली नामुष्की
एका बाजूला ऑस्ट्रेलियन संघानं पिंक बॉल टेस्टमधील आपली जादू कायम ठेवत भारतीय संघाला पराभवाचा दणका दिला. दुसरीकडे इंग्लंडच्या संघाने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ३२३ धावांनी दमदार विजय नोंदवला. या सामन्यासह इंग्लंडच्या संघाने दोन सामन्यांची कसोटी मालिका खिशात घातली. न्यूझीलंडच्या संघानं टीम इंडियाची घरच्या मैदानावर जी अवस्था केली होती तीच अवस्था इंग्लंडनं त्यांची केली.
इंग्लंडनं साधला विक्रमी डाव, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाला टाकलं मागे
न्यूझीलंड विरुद्धच्या विजयासह इंग्लंडच्या संघाने एक मोठा डाव साधला आहे. भारतीय संघाचा विक्रम मोडीत काढत त्यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वाधिक विजय नोंदवण्याचा विक्रम आपल्या नावे केलाय. इंग्लंडच्या संघाने आतापर्यंत एकदाही WTC फायनल खेळलेली नाही. पण त्यांनी या स्पर्धेत सर्वाधिक विजय नोंदवण्याच्या बाबतीत टीम इंडियाला मागे टाकले आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी विजयासह इंग्लंडचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक ३२ सामने जिंकणारा संघ ठरलाय. भारतीय संघाच्या खात्यात ३१ विजयाची नोंद आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वाधिक विजय मिळवणारे संघ
- इंग्लंड- ३२ सामने
- भारत- ३१ सामने
- ऑस्ट्रेलिया- २९ सामने
- न्यूझीलंड- १८ सामने
- दक्षिण आफ्रिका - १८ सामने
- पाकिस्तान- १२ सामने
WTC मध्ये सर्वाधिक मॅचेस खेळण्याचा विक्रमही इंग्लंडच्या नावे इंग्लंड संघाच्या नावे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक ६४ सामने खेळण्याचा रेकॉर्ड आहे. यातील २४ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असून ८ सामने हे अनिर्णित राहिले आहेत. WTC २०२३-२५ च्या हंगामात इंग्लंडच्या संघाने २१ सामन्यात फक्त ११ विजयाची नोंद केली आहे. या संघाचे विनिंग पर्सेंटेज ४५.२४ असून यंदाच्या हंगामातही हा संघ फायनलच्या शर्यतीतून आउट झाला आहे.