Jasprit Bumrah India's 'Ronaldo Says Steve Harmison : जसप्रीत बुमराहच्या फिटनेसचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी तो फिट आहे का? हा प्रश्न सर्वांना सतावत आहे. तो संघात कायम राहणार की, त्याच्या जागी अन्य कुण्या खेळाडूची संघात एन्ट्री होणार? असे अनेक प्रश्न बुमराहच्या दुखापतीमुळे निर्माण झाले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या मुद्यावर आता इंग्लंडचा माजी जलदगती गोलंदाज स्टीव हार्मिसन याने आपलं मत मांडले आहे. जसप्रीत बुमराह हा टीम इंडियाचा रोनाल्डो आहे. बुमराहशिवाय टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला जाण्याचा विचारच करू नये, असा सल्लाच त्याने बीसीसीआयला दिला आहे.
बुमराहचं महत्त्व अधोरेखित करताना इंग्लंड दिग्गजानं दिला रोनाल्डोचा दाखला इंग्लंडचा माजी गोलंदाजाने बुमराहची तुलना थेट फुटबॉल जगतातील स्टार ख्रिस्टियानो रोनाल्डोशी केली आहे. भारतीय जलदगती गोलंदाज संघासाठी किती अनमोल आहे, हे सांगण्याचा प्रयत्नच त्याने आपल्या वक्तव्यातून केल्याचे दिसते. बुमराहशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ बांधणी करणं म्हणजे सर्वोत्तम स्ट्रायकर रोनाल्डोशिवाय फुटबॉल वर्ल्ड कप खेळायला जाण्यासारखं आहे, अशा आशयाच्या शब्दांत स्टीव हार्मिसन याने टीम इंडियानं भारतीय स्टार गोलंदाजावर बिधास्त डाव खेळावा, असे मत व्यक्त केले आहे.
बुमराहला संघात कायम ठेवण्यावर दिला जोर
बुमराहचा फिटनेस आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील त्याचा सहभाग या मुद्यावरील चर्चेदरम्यान हार्मिसन याने जसप्रीत बुमराहला कोणत्याही परिस्थितीत शेवटपर्यंत संघात ठेवायला पाहिजे, यावर जोर दिला. भारतीय जलगती गोलंदाजाची जागा कोणी घेऊ शकेल, असे वाटत नाही. मी फायनलपर्यंत त्याला संघात कायम ठेवले असते, असेही या दिग्गजाने म्हटले आहे.
शेवटच्या टप्प्यात टीम इंडियासाठी फायद्याचा ठरेल हा डाव
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीनं त्रस्त दिसला. सिडनी कसोटीत त्याच्यावर मैदान सोडण्याची वेळ आली. बुमराहनं बंगळुरुस्थिती राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस टेस्ट दिली असून त्याच्या खेळण्यासंदर्भात सस्पेन्स कायम आहे. तो फिट नसेल तर कोण? असा प्रश्न चर्चेत असताना इंग्लंडच्या दिग्गजाने बुमराहला संघात कायम ठेवण्यावर भर दिला.. साखळी फेरीत तो खेळला नाही तरी शेवटच्या टप्प्यात तो संघासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे मतही स्टीव हार्मिसन याने मांडले आहे.