Join us  

जोफ्रा आर्चरच्या दुखापतीनं इंग्लंडची डोकेदुखी वाढली; IPL पाठोपाठ मोठ्या स्पर्धेतून झाला बाहेर

जोफ्रा आर्चरच्या दुखापतीनं इंग्लंडच्या संघाची डोकेदुखी वाढली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 3:18 PM

Open in App

jofra archer news | नवी दिल्ली : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आयपीएलपाठोपाठ ॲशेस मालिकेतून देखील बाहेर झाला आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात बहुचर्चित ॲशेस मालिकेचा थरार रंगणार आहे. आर्चर आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाचा हिस्सा होता. दुखापतीमुळे तो आयपीएलमधून बाहेर झाला अन् त्याच्या जागी त्याचाच सहकारी ख्रिस जॉर्डनला संघात स्थान मिळाले. खरं तर आर्चर मागील काही काळापासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्‍यामुळे त्‍याने आयपीएल २०२२ च्या हंगामातून माघार घेतली होती. 

दरम्यान, आयपीएल २०२३ मध्ये त्याने पाच सामने खेळले पण केवळ दोन बळी घेण्यात यश आले. लॉर्ड्सवर होणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी संघाची घोषणा करताना इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या वृत्ताला दुजोरा दिला. १ ते ४ जून यादरम्यान इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात कसोटी सामना खेळवला जाईल.

 आयर्लंडविरूद्धच्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ -बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोनाथन बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, ऑली रॉबिन्सन, जो रूट, ख्रिस वोक्स , मार्क वुड. 

"कोपऱ्याच्या दुखापतीमुळे जोफ्रा त्रस्त असून तो विश्रांती घेत आहे. त्यामुळे दीर्घ कालावधीसाठी त्याला क्रिकेटपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी आम्ही शुभेच्छा देतो आहोत. आम्हाला खात्री आहे की, तो इंग्लंडसाठी कोणताही फॉरमॅट असो, उशिरा ऐवजी लवकर पुनरागमन करेल", अशी माहिती इंग्लिश क्रिकेट बोर्डाने दिली. इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स देखील आयपीएलच्या अंतिम टप्प्याला मुकणार आहे. ॲशेस मालिकेसाठी इंग्लिश कर्णधार मायदेशी पतरणार असल्याचे समजते. 

ENG vs AUS ॲशेस मालिकेचे वेळापत्रक - 

  1. पहिला सामना - १६ ते २० जून
  2. दुसरा सामना - २८ ते २ जुलै
  3. तिसरा सामना - ६ ते १० जुलै
  4. चौथा सामना - १९ ते २३ जुलै
  5. पाचवा सामना - २७ ते ३१ जुलै

 

 

टॅग्स :इंग्लंडअ‍ॅशेस 2019जोफ्रा आर्चरआॅस्ट्रेलियाआयपीएल २०२३
Open in App