वन डे विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात शतकी खेळी करून ऑस्ट्रेलियाच्या हेडने भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा केला. १३७ धावांची अप्रतिम खेळी करून ट्रॅव्हिस हेडने सहाव्यांदा कांगारूंना जग्गजेतेपद मिळवून दिले. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात किताबासाठी लढत झाली, ज्यात यजमान संघाला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने मोठा विजय साकारला. हेडने शतकी खेळीशिवाय भारतीय कर्णधार रोहित शर्माचा अविस्मरनीय झेल घेऊन कमाल केली. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या हेडवर आयपीएलच्या करारात मोठी बोली लागेल असा दावा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने केला.
भारतीय संघात चांगल्या फलंदाजांची फळी आहे, तर ऑस्ट्रेलियन संघ देखील कमी नव्हता... अंतिम सामन्यात ज्या पद्धतीने ट्रॅव्हिस हेडने कामगिरी केली, ती नक्कीच कौतुकास्पद आहे. पहिल्या डावात प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराचा अप्रतिम झेल घेतल्याने त्याचा आत्मविश्वास शिगेला पोहचला, असे वॉनने सांगितले. त्याने 'द सिडनी मॉर्निंग हेराल्ड'साठी लिहलेल्या लेखात विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला.
मायकल वॉनकडून हेडचे कौतुक "मागील काही काळात हेडने नेमके काय केले आहे याची मला खात्री नाही, परंतु तो सर्व क्रिकेटपटूंसाठी एक उत्तम उदाहरण आहे की कितीही वाईट वेळ आली तरी सुधारणेला वाव आहे. काही वर्षांपूर्वी त्याचा इम्पॅक्ट फारसा नव्हता... पण आता परिस्थिती बदलली असून समोरचे संघ त्याच्या फलंदाजीचा सामना करण्यासाठी धडे घेतात. त्यामुळे मला वाटते आगामी आयपीएल करारात त्याच्यावर पैशांचा पाऊस होऊ शकतो अर्थात मोठी बोली लागण्याती शक्यता नाकारता येत नाही", अशा शब्दांत मायकल वॉनने हेडचे कौतुक केले. भारताचा विजयरथ रोखून ऑस्ट्रेलिया चॅम्पियन अंतिम सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाला शुबमन गिलच्या (४) रूपात मोठा झटका बसला. त्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (४७) आणि विराट कोहली (५४) यांनी डाव सावरला. पण ग्लेन मॅक्सवेलच्या षटकांत चुकीचा फटका मारून रोहित बाद झाला. ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम झेल घेऊन हिटमॅनला बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरीकडे विराट सावध खेळी करून भारताचा डाव पुढे नेत होता. अशातच ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने यजमानांना आणखी एक धक्का देत श्रेयस अय्यरला तंबूत पाठवले. मग विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी भारतीयांच्या आशा जिवंत ठेवल्या अन् भागीदारी नोंदवली. निर्धाव चेंडूमुळे दबाव वाढत गेल्याने भारत अडचणीत सापडला. त्यात विराटला नशिबाची साथ न मिळाल्याने बाहेर जावे लागले. विराटने (५४) आणि राहुलने (६६) धावा करून ऑस्ट्रेलियासमोर सन्माजनक आव्हान उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. अखेर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. २४१ धावांचा पाठलाग करताना कांगारूंनी ट्रॅव्हिस हेडच्या (१३७) शतकी खेळीच्या जोरावर मोठा विजय मिळवला.