IPL 2021 : ‘आयपीएलदरम्यान मजबूत बायोबबल तयार करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही लीगमध्ये कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे आढळल्याने खळबळ माजली होती,’ अशी प्रतिक्रिया आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळलेला दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिस याने दिली. त्याचप्रमाणे, ‘मायदेशी परतल्यानंतर दिलासा मिळाला,’ असेही मॉरिसने यावेळी सांगितले.
कोरोनाच्या प्रकोपामुळे यंदाची आयपीएल मध्यावरच स्थगित करण्यात आल्यानंतर मॉरिस आणि दक्षिण आफ्रिकेचे अन्य दहा खेळाडू मायदेशी परतले आहेत. आयपीएलमध्ये एकूण सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये चार खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांचा समावेश होता. मॉरिस सध्या आपल्या घरी दहा दिवस विलगीकरणात राहील. यावेळी त्याने एका संकेतस्थळाला मुलाखत देताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
मॉरिस म्हणाला की, ‘नक्कीच घरी सुरक्षित येणे दिलासादायक आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती मला रविवारी रात्री मिळाली. त्यामुळेच बायोबबलमध्ये राहूनही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, सर्वांनीच चिंता व्यक्त केली. त्यामुळे प्रत्येकाच्याच मनात धोक्याची घंटा वाजू लागली होती. सोमवारपर्यंत जेव्हा सामना रद्द करण्यात आला होता, तेव्हा आम्हाला कळाले होते की, स्पर्धा सुरू ठेवण्यासाठी दबाव वाढला आहे.’
मॉरिस पुढे म्हणाला की, ‘मी माझ्या डॉक्टरसोबत बोलत असताना कुमार संगाकाराने इशारा केला आणि त्यानंतर आम्हाला कळाले की, आता स्पर्धा पुढे रंगणार नाही. त्यानंतरचे वातावरण खळबळजनक होते. खास करून इंग्लंडचे खेळाडू खूप घाबरले होते. कारण त्यांना इंग्लंडमधील हॉटेलमध्ये वेगवेगळे राहणे जरुरीचे होते. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे रूम्स उपलब्ध नव्हत्या.’
युवा खेळाडूला दिला धीरआयपीएल स्थगित होण्याच्या काही दिवसांआधीच ऑस्ट्रेलियाच्या अँड्र्यू टायने स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यामुळे त्याच्याजागी इंग्लंडचा २० वर्षीय गेराल्ड कोएट्झी याची निवड करण्यात आली होती आणि तो एका आठवड्याआधीच भारतात आला होता. मॉरिसने त्याच्याविषयी सांगितले की, ‘गेराल्ड अधिक घाबरलेला होता, याची मला कल्पना होती. तो केवळ २० वर्षांचा आहे आणि त्याच्यासमोरच हा सगळा प्रसंग घडत होता. त्यामुळे मी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला.