England squad for World Cup 2023 : इग्लंडने २०२३ विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे. जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये हॅरी ब्रूकचा ( Harry Brook) समावेश करण्यात आला असून जेसन रॉयला ( Jason Roy) वगळण्यात आले आहे. इंग्लंड संघ निवडक ल्यूक राईट म्हणाले, 'आम्ही जो संघ निवडला आहे, तो भारतात जाऊन वर्ल्ड कप जिंकेल, असा आम्हाला विश्वास आहे. आमच्याकडे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळणारे दमदार खेळाडू आहेत आणि त्यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत क्षमता दाखवून दिली आहे. संघाच्या ताकदीमुळे आम्हाला काही कठीण निर्णय घ्यावे लागले आहेत. यामुळे जेसन रॉयला वगळण्यात आले आहे.'
इंग्लंड ५ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध अहमदाबाद येथून वर्ल्ड कपमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. दोन्ही संघ मागील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. इंग्लंड गतविजेता म्हणून मैदानावर उतरेल. २०१९ मध्ये इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने वर्ल्ड कप जिंकला होता. ३३ वर्षीय रॉय २०१९च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता. त्याला या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडच्या तात्पुरत्या संघात ठेवण्यात आले होते. पण पाठ दुखीमुळे रॉय न्यूझीलंडविरुद्धची वन डे मालिका खेळू शकला नाही. त्याच्या गैरहजेरीत डेविड मलान ओपनिंग केली आणि त्याने ३ सामन्यांत ९२.३३च्या सरासरीने २७७ धावा केल्या. अशा परिस्थितीत इंग्लंडने सलामीवीर म्हणून जॉनी बेअरस्टोसह मलानची निवड केली.