India vs England 5th Test : भारत-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेतील पाचवा व शेवटचा सामना उद्यापासून धर्मशाला येथे सुरू होत आहे. भारतीय संघाने मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. पहिली कसोटी गमावल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने सलग ३ सामने जिंकले आणि आता त्यांना ११२ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. पण, इंग्लंडला किमान पाचवी कसोटी जिंकून इभ्रत वाचवण्याची संधी आहे आणि या कसोटीसाठी त्यांनी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. इंग्लंडने संघात एक बदल केला आहे आणि ऑली रॉबिन्सनच्या जागी मार्क वूड याचे पुनरागमन झाले आहे.
मालिकेच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा २८ धावांनी पराभव झाला. पण, टीम इंडियाने पुढील तीन कसोटी सामने जिंकून मालिका जिंकली. अशा प्रकारे टीम इंडियाने घरच्या भूमीवर १७ वी मालिका जिंकली. भारताने मालिका जिंकली असेल पण इंग्लंड संघाला भारतीय भूमीवर दोन कसोटी जिंकणारा २१व्या शतकातील तिसरा संघ बनण्याची संधी आहे. टीम इंडियाने मालिका ४-१ ने जिंकली, तर पहिली कसोटी गमावल्यानंतरही या फरकाने मालिका जिंकणारा ११२ वर्षांच्या इतिहासातील हा पहिला संघ बनेल.
इंग्लंड संघाने शेवटच्या वेळी ऑस्ट्रेलियन भूमीवर हा पराक्रम १९१२ मध्ये केला होता आणि ॲशेस मालिका जिंकली होती. आत्तापर्यंत असे फक्त तीन वेळा घडले आहे जेव्हा मालिकेत ०-१ ने पिछाडीवर असतानाही संघांनी अखेरीस ४-१ ने मालिका जिंकली आहे. इंग्लंडने १९१२ मध्ये हे केले. ऑस्ट्रेलियाने १८९७/९८ आणि १९०१/०२ मध्ये इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
इंग्लंडचा संघ - झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वूड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर