नवी दिल्ली : इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय याने आयपीएल २०२२ मधून माघार घेतल्यामुळे नवा संघ गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला. क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार रॉयने बायोबबलमधील थकव्याचे कारण दिले. दीर्घकाळ बायोबबलमध्ये राहू शकणार नाही, असे रॉय म्हणाला.
गुजरात संघाने रॉयचा पर्याय कोण याची घोषणा केलेली नाही. नुकत्याच झालेल्या लिलावात संघाने रॉयला दोन कोटीच्या मूळ किमतीत त्याला संघात घेतले होते. युवा शुभमान गिल याच्यासोबत सलामीचा सहकारी म्हणून गुजरातने त्याची निवड केली होती. आयपीएलमधून रॉयने माघार घेण्याची ही दुसरी वेळ आहे. २०२० मध्ये दिल्ली संघाने त्याला दीड कोटी रुपयात संघात घेतले होते. आयपीएलचे १५ वे पर्व २६ मार्चपासून सुरू होत आहे. मागच्या पर्वात रॉय सनरायजर्स हैदराबादकडून खेळला होता. यंदा तो पाकिस्तान सुपर लीगमध्येही क्वेटा ग्लॅडिएटर्स संघासाठी खेळला.
आज जड अंत:करणाने मला हे सांगावे लागते आहे की यावर्षीच्या आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी गुजरातच्या संघ व्यवस्थापनाचे आणि कर्णधार हार्दिकचे आभार मानू इच्छितो की त्यांनी लिलावाच्या वेळी माझ्यावर विश्वास दाखवून मला संघात निवडले होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून जगभरात जे सुरू आहे त्यामुळे कुठेतरी माझ्यावर त्याचा ताण आला आहे. त्यामुळेच मला सध्या माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे तसेच वर्षभरातल्या व्यस्त वेळापत्रकापूर्वी मला स्वत:साठी आणि खेळ सुधारण्यासाठी काही वेळ हवा होता. मी आयपीएल खेळणार नसलो तरी मी गुजरातचा प्रत्येक सामना बघणार आहे आणि त्यांना विजेतेपदासाठी पाठिंबा देणार आहे. मला नेहमीच पाठिंबा देणाऱ्या आणि माझ्या या निर्णयात माझ्यासोबत असणाऱ्या प्रत्येकाचा मी मनापासून आभारी आहे.