न्यूझीलंडमधील नेपीयर येथे आणखी एक वादळी खेळी अनुभवायला मिळाली. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यात डेवीड मलाननं तुफान फटेकबाजी केली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यातील मलानचे हे पहिलेच शतक ठरले आणि इंग्लंडकडून ट्वेंटी-20 त शतक करणारा मलान हा अॅलेक्स हेल्सनंतर दुसरा फलंदाज ठरला. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने 20 षटकांत 3 बाद 241 धावा चोपल्या. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील त्यांची ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची दमछाक झाली आणि त्यांना 165 धावांवरच समाधान मानावे लागले. या विजयासह इंग्लंडने मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली.
इंग्लंडचा संघ 1-2 असा पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी त्यांना हा सामना जिंकणं महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीनंच त्यांनी आज खेळ केला. पण, जॉनी बेअरस्टो ( 8) लवकर माघारी परतला. टॉम बँटन ( 31) याने मलानसह संघाचा डाव सावरला. पण, बँटन बाद झाल्यानंतर मलान व कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 182 धावांची विक्रमी भागीदारी करताना संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. मॉर्गनचे शतक अवघ्या 9 धावांनी हुकले. या सामन्यात मलानने 48 चेंडूंत शतक पूर्ण केले. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील त्याचे हे पहिलेच शतक ठरले. मलान 51 चेंडूंत 9 चौकार व 6 षटकार खेचून 103 धावांवर नाबाद राहिला. मलानने इश सोढीच्या एका षटकात 28 धावा चोपून काढल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना मार्टिन गुप्तील आणि कॉलीन मुन्रो यांनी 4 षटकांत 50 धावा चोपून काढल्या आणि न्यूझीलंडला आश्वासक सुरुवात करून दिली. पण, पाचव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर गुप्तील 14 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकार खेचून 27 धावांत माघारी परतला. टॉम कुरनने त्याला बाद केले. या विकेटनंतर टीम सेइफर्ट ( 3), कॉलीन डी ग्रँडहोम (7), डॅर्ली मिचेल ( 2) हे झटपट परतल्यानंतर न्यूझीलंडचा संघ अडचणीत सापडला. मॅट पार्किसनने किवीच्या चार फलंदाजांना माघारी पाठवून इंग्लंडचा विजय निश्चित केला. मुन्रो 21 चेंडूंत 3 चौकारांसह 30 धावा करून बाद झाला, तर टीम साऊदीनं 15 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकारांसह 39 धावा कुटल्या. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 16.5 षटकांत 165 धावांत तंबूत परतला.