नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात मंकडिंग पद्धतीने धावबाद केले होते. या वादग्रस्त धावबादची चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही आहे. क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी या विषयावर आपली वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत. अशातच इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या फॉरमॅटचा कर्णधार जोस बटलरने याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. मंकडिंग संबंधित प्रश्न विचारण्यात आला तेव्हा बटलरने अप्रतिम उत्तर देऊन सर्वांची मने जिंकली आहेत.
दरम्यान, आपण पूर्णपणे या रनआउटचे समर्थन करत नसल्याचे जोस बटलरने म्हटले. त्याच्या म्हणण्यानुसार, इंग्लंडच्या संघातील कोणत्याही खेळाडूने असे काही केले तर तो संबंधित फलंदाजाला माघारी बोलावेल. जरी त्याचा संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळत असला तरीही. एमसीसी क्रिकेटच्या कायद्यांचे संरक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी फलंदाज क्रीजच्या बाहेर गेला आणि धावबाद केले तर ते नियमानुसार योग्य आहे. मात्र बटलरच्या या विधानामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
दीप्ती शर्माच्या 'मंकडिंग'वरून चिघळला वाद
इंग्लंडच्या मर्यादीत षटकांचा कर्णधार जोस बटलरने टॉकस्पोर्टशी बोलताना म्हटले, "नाही, इंग्लंडच्या गोलंदाजाने असे केले तर मी फलंदाजाला माघारी येण्यास सांगेन. खेळात अशा गोष्टी कोणीही पाहू इच्छित नाही. क्रिकेटच्या खेळात बॅट आणि बॉलमधील रोमांचक लढत व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मला असे वाटते की त्यासाठी खास नियम असावेत जेणेकरून लोक त्याचा गैरफायदा घेणार नाहीत. परंतु नियम करणाऱ्यांनी ते पुन्हा पाहावे कारण कायदा ज्या प्रकारे लिहिला गेला आहे, तो कुठेतरी प्रश्न निर्माण करतो." बटलरला संघाचा उपकर्णधार मोईन अलीनेही पाठिंबा दिला होता. पाकिस्तानमधील टी-20 मालिकेत संघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या मोईनने सांगितले की, मी याचे समर्थन करत नाही. लक्षणीय बाब म्हणजे आयपीएमध्ये जोस बटलर स्वत: देखील मंकडिंगचा शिकार झाला आहे. रविचंद्रन अश्विनने बटलरला याच पद्धतीने बाद केले होते, ज्यानंतर मोठा वाद चिघळला होता.