danielle wyatt wpl : जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीग. आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेल्या महिला प्रीमिअर लीगनेदेखील प्रसिद्धी मिळवली. मागील दोन वर्षांपासून महिला प्रीमिअर लीग जगभरातील महिला क्रिकेटपटूंसाठी एक नवीन व्यासपीठ बनले आहे. पदार्पणाच्या हंगामात मुंबई इंडियन्स तर दुसऱ्या अर्थात गतवर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने या स्पर्धेचा किताब पटकावला. आता आरसीबीच्या संघात इंग्लंडची स्टार अष्टपैलू खेळाडू डॅनियल व्हॅटची एन्ट्री झाली आहे. ती याआधी अनेकदा चर्चेत आली आहे. तिने भारतीय क्रिकेटर विराट कोहलीला लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यानंतर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सोबतचा फोटो व्हायरल झालेली महिला क्रिकेटपटू डॅनियल व्हॅट हिने थाटामाटात समलिंगी विवाह केला.
डॅनियलने लंडनमधील कॅबेज फुटबॉल क्लबची प्रमुख जॉर्जिया हॉज हिच्यासोबत तिने लग्नगाठ बांधली. इंग्लंडची महिला अष्टपैलू डॅनिएल व्हॅट ही यष्टिरक्षक-फलंदाज आहे. ती आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. इंग्लिश क्रिकेट संघाचे अनेक विक्रम तिच्या नावावर आहेत. ती फ्रँचायझी क्रिकेटही खूप खेळते. दरम्यान, डॅनियलची आरसीबीच्या संघात एन्ट्री होताच चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया देऊन फ्रँचायझीची फिरकी घेतली.
आरसीबीने सोशल मीडियाच्या माध्यमातून डॅनियल व्हॅटचे आपल्या संघात स्वागत केले. स्टार इंग्लिश अष्टपैलू खेळाडू डॅनियल व्हॅट, जी २०१७ च्या आयसीसी विश्वचषक विजेत्या संघाचा भाग राहिली आहे, ती महिला प्रीमिअर लीग २०२५ साठी आरसीबीच्या संघासोबत जोडली गेली आहे. ट्रेड विंडोद्वारे तिला गतविजेत्या संघाचे तिकीट मिळाले. खरे तर डॅनियलला महिला प्रीमिअर लीगच्या पहिल्या हंगामात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. ती लिलावात अनसोल्ड राहिल्याने तिने नाराजीदेखील व्यक्त केली होती. मात्र, स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामात ती यूपी वॉरियर्स संघाकडून खेळली.