James Vince News : इंग्लंडचा क्रिकेटर जेम्स विन्सच्या घरावर दुसऱ्यांदा हल्ला झाला. अज्ञातांनी हल्ला केल्याने एकच खळबळ माजली. यापूर्वी एप्रिल महिन्यात असाच हल्ला करण्यात आला होता. स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इंग्लंडमधील हॅम्पशायर शहरात पत्नी आणि दोन मुलांसह राहणाऱ्या विन्सच्या घरावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. त्यामुळे त्याच्या दोन्ही वाहनांच्या काचा फुटल्या. हल्लेखोराने घरावर देखील दगडफेक केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती घरावर दगडफेक करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
३३ वर्षीय डावखुरा फलंदाज विन्सने पोलिसांत तक्रार दाखल केली. खरे तर या आधी देखील विन्सच्या घरावर अज्ञाताने हल्ला केला होता. एप्रिलमध्ये विन्सच्या घरावर गुंडांनी हल्ला केला होता, ज्यामध्ये त्याच्या घराच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. त्या दुरुस्त करायला एक महिना लागला, पण काही दिवसांनी विन्सच्या घरावर पुन्हा एकदा हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
जेम्स विन्स फारसा नामांकित नसला तरी तो इंग्लिश संघाचा प्रमुख खेळाडू राहिला आहे. त्याने २००९ मध्ये हॅम्पशायर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. देशांर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून राष्ट्रीय संघाचे तिकीट मिळवण्यात विन्सला यश आले. २०१५ मध्ये त्याने इंग्लंडसाठी पदार्पण केले. आतापर्यंत त्याने १३ कसोटी, २५ वन डे, आणि १७ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे ५४८, ६१६ आणि ४६३ धावा केल्या आहेत.
हल्ला होताच विन्सने भावनिक साद घातली. त्याने म्हटले की, या हल्ल्यांबाबत कोणाला काही माहिती असल्यास कृपया शेअर करा किंवा हॅम्पशायर पोलिसांशी संपर्क साधा. आम्हाला स्थानिक पातळीवर पाठिंबा मिळत आहे. आमच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे. जर कोणी अधिक माहिती देऊ शकत असेल तर त्यांनी पुढे यावे.