लीड्स : गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या बळावर आज येथे इंग्लंडने दुसऱ्या कसोटीच्या तिस-याच दिवशी पाकिस्तानचा एक डाव आणि ५५ धावांनी धुव्वा उडवताना दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडविली.
पाकिस्तानने लॉर्डस्मधील पहिली कसोटी ९ विकेटने जिंकली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वेस्ट इंडीजला नमवल्यानंतर इंग्लंडचा कसोटी सामन्यातील हा पहिला विजय आहे. यादरम्यान त्यांना आठपैकी सहा सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. पाकिस्तानच्या पहिल्या डावातील १७४ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने जेम्स बटलरच्या नाबाद ८० धावांच्या बळावर ३६३ धावा करीत १८९ धावांची आघाडी घेतली. पाकिस्तानचा दुसरा डाव फक्त १३४ धावांत आटोपला. त्यात त्यांनी अखेरचे ७ फलंदाज अवघ्या ५० धावांत गमावले. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने दुसºया डावातदेखील ३ गडी बाद केले. आॅफस्पिनर डोमिनिक बेसने ३३ धावांत ३ फलंदाजांना तंबूत पाठविले. पाकिस्तानकडून इमाम उल हकने ३४ व कसोटी पदार्पण करणाºया उस्मान सलाहुउद्दीनने ३३ धावा केल्या.
तत्पूर्वी, इंग्लंडने आज ७ बाद ३0२ या धावसंख्येवरून खेळण्यास सुरुवात केली. त्यावेळी जोश बटलर ४४ व सॅम कुर्रान १६ धावांवर खेळत होते. तथापि, कुर्रान त्याच्या २0 व्या वाढदिवशी २0 धावांवर मोहंमद अब्बासच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये झेल देऊन तंबूत परतला.
शनिवारी ४ धावांवर हसन अलीने बटलर याला दिलेले जीवदान आज पाकिस्तानसाठी महागात पडले. बटलरने आज वेगवान गोलंदाज अब्बासला सलग दोन चौकार आणि नंतर षटकार ठोकत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्याला ६६ धावांवर सलाहुउद्दीननेदेखील जीवदान दिले. बटलर ८0 धावांवर असताना दुसरीकडून जेम्स अँडरसन हा हसन अली याचा शिकार बनला.
बटलरने १0१ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह नाबाद ८0 धावा केल्या.
पाकिस्तानकडून फहीद अशरफने ६0 धावांत ३ गडी बाद केले. मोहंमद आमीर, मोहंमद अब्बास आणि हसन अली यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. यासाठी त्यांनी अनुक्रमे ७२, ७८ व ८२ धावा मोजल्या.
Web Title: England set the series 1-1
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.