इंग्लंड क्रिकेट संघ पुन्हा एकदा भारतात परतला आहे. हा इंग्लंडचा संघ सध्या भारतीय दौऱ्यावर ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या दोन सामन्यांनंतर मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे.
दुसरा सामना गमावल्यानंतर इंग्लंडचा संघ विश्रांती आणि सरावासाठी अबुधाबीला गेला होता. मात्र आता तिसऱ्या सामन्यासाठी राजकोटला पोहोचले आहे. यादरम्यान इंग्लंड संघाचा स्टार फिरकीपटू रेहान अहमदला राजकोट विमानतळावर थांबवण्यात आले. पाकिस्तानी वंशाच्या रेहान अहमदकडे फक्त सिंगल एंट्री व्हिसा होता. या कारणामुळे त्याला विमानतळावर थांबवण्यात आले. रेहान अहमदला राजकोट विमानतळावर २ तासांहून अधिक काळ त्रासाला सामोरे जावे लागले.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तातडीने व्हिसाची कार्यवाही केली. यानंतर रेहान अहमदला व्हिसा देण्यात आला आणि त्यानंतर त्याला जाण्याची परवानगी देण्यात आली. या मालिकेपूर्वी पाकिस्तानी वंशाच्या शोएब बशीरला व्हिसामुळे अबुधाबीमध्ये राहावे लागले होते. मात्र, काही दिवसांनी त्याला व्हिसा मिळाला आणि त्यानंतर तो भारतात आला. यानंतर तो दुसरी कसोटीही खेळला.
तिसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंड संघाला धक्का
तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार फिरकी गोलंदाज जॅक लीच दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. ३२ वर्षीय जॅक लीचला हैदराबाद कसोटी सामन्यादरम्यान डाव्या गुडघ्याला दुखापत झाली, ज्यामुळे तो विझाग (विशाखापट्टणम) येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नाही.
कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघ:
जॅक क्राउली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (सी), बेन फोक्स (वि.), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, मार्क वुड, ऑली रॉबिन्सन, डॅन लॉरेन्स, गस ऍटकिन्सन .
शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, देवदत्त पडीकल.
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी: २५-२९ जानेवारी, हैदराबाद (इंग्लंड २८ धावांनी विजयी)
दुसरी कसोटी: २-६ फेब्रुवारी, विशाखापट्टणम (भारत १०६ धावांनी विजयी)
तिसरी कसोटी: १५-१९ फेब्रुवारी, राजकोट
चौथी कसोटी: २३-२७ फेब्रुवारी, रांची
पाचवी कसोटी: ७-११ मार्च, धर्मशाला
Web Title: England spinner Rehan Ahmed stopped at Rajkot airport due to visa issue
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.