इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या तयारीला वेग पकडला असताना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार व अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स ( Ben Stokes) याने आयपीएल २०२४ पासून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वर्क लोड मॅनेज आणि फिटनेसचं कारण देत त्याने हा निर्णय घेतला आहे. वन डे क्रिकेटमधील निवृत्ती मागे घेत त्याने नुकत्याच पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सहभाग घेतला होता. बेन स्टोक्सच्या माघारीमुळे चेन्नई सुपर किंग्सच्या पर्समध्ये आयपीएल लिलावासाठी २८ कोटी रुपये राहिले आहेत.
CSK च्या व्यवस्थापनाने स्टोक्सचा हा निर्णय मान्य केला आहे. आयपीएल २०२४ पूर्वी इंग्लंडचा संघ भारताविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे स्टोक्सवर प्रचंड वर्क लोड असणार आहे. आयपीएलनंतर जूनमध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कपही खेळायचा आहे. ३२ वर्षीय स्टोक्सने २०१७ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि ४५ सामन्यांत त्याने ९३५ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर २ शतकं व २ अर्धशतकं आहेत. नाबाद १०७ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.