Ben Stokes News : इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने एक लांबलचक पोस्ट शेअर करत धक्कादायक प्रकार सांगितला. पाकिस्तान दौऱ्यावर असताना इंग्लिश खेळाडूच्या घरात चोरी झाली. बेन स्टोक्स कसोटी मालिकेसाठी अलीकडेच पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. तेव्हा त्याच्या इंग्लंडमधील घरातून महागड्या वस्तूंची चोरी झाली. चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये स्टोक्सचे OBE पदक, महागडी बॅग आणि काही चैनीच्या वस्तू आदींचा समावेश आहे.
१७ ऑक्टोबर रोजी ही चोरीची घटना घडली. स्टोक्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करताना आपली आपबीती मांडली. "१७ ऑक्टोबरला सांयकाळी काही अज्ञात लोकांनी नॉर्थ ईस्टमधील कॅसल इडन परिसरातील माझ्या घरावर हल्ला चढवला. त्यांनी किमती वस्तूंची चोरी केली. यामध्ये काही वैयक्तिक सामानाचादेखील समावेश आहे. यातील काही गोष्टींशी माझ्या कुटुंबीयांच्या खूप भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे ज्यांनी ही चोरी केली आहे त्यांना पकडून द्यावे असे मी आवाहन करतो", असे स्टोक्सने पोस्टच्या माध्यमातून म्हटले.
चोरीची घटना घडली तेव्हा स्टोक्सची पत्नी आणि मुले घरातच होती. स्टोक्स म्हणाला की, माझी पत्नी आणि दोन मुले घरात असताना ही चोरी झाली ही खूपच दुर्दैवी बाब आहे. पण, सुदैवाने माझ्या कुटुंबातील कोणालाच इजा झाली नाही. मात्र, ही घटना किती गंभीर आहे याचा तुम्ही विचार करू शकता. यामुळे नक्कीच आमचे खच्चीकरण झालेय. याशिवाय स्टोक्सने चोरीला गेलेल्या वस्तूंचे फोटोदेखील शेअर केले आहेत. २०२० मध्ये क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानासाठी त्याला OBE पदक देण्यात आले होते.
"आम्ही नक्कीच मोठी संपत्ती गमावली आहे, परंतु सर्वांना माहिती मिळावी या हेतूने मी हे फोटो शेअर करत आहे. ज्यांनी या वस्तूंची चोरी केली आहे, त्यांना पकडण्यासाठी हे मी करत आहे", असेही बेन स्टोक्सने नमूद केले.