लंडन : इंग्लंडविरुद्ध ४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेआधी किमान दोन सराव सामने खेळू देण्याची बीसीसीआयची विनंती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने गुरुवारी मान्य केली. मालिका सुरू होण्याआधी भारतीय खेळाडू आता डरहम येथे सराव करतील. त्याचवेळी काऊंटी संघांविरुद्ध क्रमश: चार आणि तीन दिवसांचे दोन सराव सामने चेस्टर ली स्ट्रीट मैदानावर आयोजित केले जातील.
कर्णधार विराट कोहली याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर इंग्लंडविरुद्ध मालिकेआधी काऊंटी संघांविरुद्ध सराव सामने खेळायला मळावेत, अशी मागणी केली होती. बीसीसीआयने कोहलीचा विचार ध्यानात घेत ईसीबीकडे सराव सामने खेळविण्याची विनंती केली. ईसीबीने ती लगेचच स्वीकारली.
ईसीबीच्या प्रवक्त्याने ‘डेली मेल’शी बोलताना सांगितले की, भारतीय संघ डरहम येथे १ ऑगस्टपर्यंत सराव करेल. यादरम्यान प्रोटोकाॅलचे तंतोतंत पालन व्हावे आणि नियमानुसार भारतीय खेळाडू याच ठिकाणी वास्तव्यास असतील. नंतर सराव सामन्यांचेदेखील आयोजन होणार आहे. भारत- इंग्लंड मालिकेतील पहिला सामना नॉटिंघम येथे ४ ते ८ ऑगस्ट या कालावधीत खेळला जाईल. दुसरा कसोटी सामना लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर १२ ते १६ ऑगस्ट या कालावधीत होईल. तिसऱ्या सामन्याचे आयोजन २५ ते २९ ऑगस्टदरम्यान लीड्सवर होईल तर चौथा सामना २ ते ६ सप्टेंबर या कालावधीत लंडनच्याच ओव्हल मैदानावर खेळविला जाईल. मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना ६ ते १० सप्टेंबरपर्यंत मॅनचेस्टरमध्ये होईल.
१५ जुलैला भारतीय खेळाडू एकत्र येणारदरम्यान बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना डरहम येथे १५ जुलै रोजी एकत्र येण्यास सांगितले आहे. न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळल्यानंतर सर्व खेळाडू बायोबबल सोडून सुटीवर गेले आहेत. सोबत त्यांचे कुटुंबीयदेखील आहे. खेळाडूंना १५ जुलै रोजी लंडनमध्ये एकत्र यायचे होते; मात्र आता डरहम येथे येण्यास सांगण्यात आले आहे.