Join us  

India VS England: गुलाबी चेंडूवर इंग्लंड दोन दिवसात चित; टीम इंडियाचा १० गड्यांनी विजय

अक्षर सामनावीर, विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 12:10 AM

Open in App

अहमदाबाद : अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन यांनी फिरकीला अनुकूल खेळपट्टीचा लाभ घेत दिवस-रात्र कसोटीत भारताला गुरुवारी दुसऱ्या दिवशी इंग्लंडिवरुद्ध १० गडी राखून विजय मिळवून दिला. सामन्यात एकूण ११ बळी घेणारा अक्षर पटेल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. 

आपला दुसरा कसोटी सामना खेळत असलेल्या अक्षरने गृहमैदानावर दुसऱ्या डावात ३२ धावांत ५ बळी घेतले. त्याने सामन्यांत एकूण ७० धावांत ११ फलंदाजांना बाद केले. अश्विनने ४८ धावांत ४ बळी घेतले आणि ४०० बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या विशेष क्लबमध्ये स्थान मिळवले. इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात ८१ धावांत गारद झाला. भारताविरुद्ध त्यांची ही दुसरी नीचांकी धावसंख्या आहे. 

भारतापुढे विजयासाठी ४९ धावांचे लक्ष्य होते. दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात भारताने विकेट न गमावता लक्ष्य गाठले. रोहित शर्मा (नाबाद २५) याने विजयी षटकार ठोकला तर शुभमन गिल १५ धावा काढून नाबाद राहिला. भारताने चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेत विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळविण्याच्या दिशेने आगेकूच केली. इंग्लंड या पराभवामुळे फायनलच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला. भारताने ४ मार्चपासून सुरू होणारा चौथा कसोटी सामना अनिर्णीत राखला, तरी जूनमध्ये लॉर्ड्स मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध फायनलमध्ये खेळण्याचा हक्क मिळवेल. 

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्टीवर पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशीही फलंदाज एकापाठोपाठ बाद होत गेले. दुसऱ्या दिवशी एकूण १७ बळी गेले.  भारताने पहिल्या सत्रात ३ बाद ९९ धावसंख्येवरून पुढे खेळताना १४५ धावा केल्या आणि पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी घेतली. इंग्लंडने पहिल्या डावात ११२ धावा केल्या होत्या. त्यांनी दुसऱ्या डावात भारताविरुद्ध आपली नीचांकी धावसंख्या नोंदवली. यापूर्वीचा रेकॉर्ड १०१ होता. ही धावसंख्या त्यांनी १९७१ मध्ये ओव्हलमध्ये नोंदवली होती. 

खेळपट्टीचे स्वरूप असे होते की, इंग्लंडचा पर्यायी ऑफ स्पिनर ज्यो रुटने ८ धावांत ५ बळी घेतले, तर जॅक लीचने ५४ धावांत ४ फलंदाजांना माघारी परतवले. रुटने दुसऱ्या डावात गोलंदाजीची सुरुवात केली.  पहिल्या डावात ६ बळी घेणाऱ्या अक्षर पटेलने नव्या चेंडूने गोलंदाजीची सुरुवात केली. त्याने दुसऱ्या डावात  ३२  धावांत ५ बळी घेतले. भारतातर्फे पहिल्या डावात रोहित शर्माने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली होती. 

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात २२ व्यांदा कसोटी सामना दोन दिवसांत संपला. भारतात असे दुसऱ्यांदा घडले. यापूर्वी २०१८ मध्ये भारताने अफगाणिस्तानचा बेंगळुरूमध्ये दोन दिवसांत पराभव केला होता. गुरुवारी संपलेल्या लढतीत केवळ १४०.२ षटके गोलंदाजी झाली. षटकांचा विचार करता सर्वांत कमी षटके टाकण्याच्या बाबतीत हा कसोटी सामना सातव्या क्रमांकावर आहे.  

कोहलीने मोडला धोनीचा विक्रम

इंग्लंडविरुद्ध १० गडी राखून विजय मिळवित विराट कोहली भारतात सर्वाधिक विजय नोंदविणारा कर्णधार ठरला. त्याने महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला. कोहलीने २९ कसोटी सामन्यांत संघाचे नेतृत्व करताना २२ विजय मिळविले आहेत. धोनीने ३० कसोटी सामन्यांत संघाचे नेतृत्व करताना २१ विजय मिळविले आहेत.

अश्विन ४००

ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने कसोटी कारकिर्दीत ४०० बळी पूर्ण केले. असा पराक्रम करणारा अश्विन अनिल कुंबळे, कपिलदेव व हरभजन सिंग यांच्यानंतरचा चौथा भारतीय गोलंदाज, तर क्रिकेटविश्वातील सहावा फिरकीपटू ठरला. सर्वातकमी कसोटींमध्ये अशी कामगिरी केलेला अश्विन दुसरा गोलंदाज ठरला. अश्विनने ७७ कसोटींत ही कामगिरी केली असून श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने ७२ कसोटींत हा पराक्रम केला आहे.

रुटने चेंडूने पाडली छाप

इंग्लंडचा कर्णधार जो रुट याने गोलंदाजीत छाप पाडताना केवळ ८ धावांत ५ बळी घेत भारताला स्वस्तात गुंडाळले. सर्वात कमी धावांत ५ बळी घेण्याची सर्वोत्तम कामगिरी रुटने केली. याआधी ऑस्ट्रेलियाच्या टिम मे याने विंडीजविरुद्ध ९ धावांत ५, तर ऑस्ट्रेलियाच्याच मायकल क्लार्कने भारताविरुद्ध ९ धावांत ६ बळी घेतले होते. रुटची कामगिरी कसोटी कर्णधाराची दुसरी सर्वोत्तम ठरली. 

 इंग्लंड पहिला डाव : ११२ भारत पहिला डाव : १४५

इंग्लंड दुसरा डाव 

जॅक क्राउली  त्रि. गो. पटेल ००, डोम सिब्ली झे. पंत गो. पटेल ०७, जॉनी बेयरस्टॉ  त्रि. गो. पटेल ००, ज्यो रुट पायचित गो. पटेल १९, बेन स्टोक्स पायचित गो. अश्विन २५, ओली पोप त्रि. गो. अश्विन १२, बेन फॉक्स पायचित गो. पटेल ०८, जोफ्रा आर्चर पायचित गो. अश्विन ००, जॅक लीच झे. रहाणे गो. अश्विन ०९, स्टुअर्ट ब्रॉड नाबाद ०१, जेम्स अँडरसन झे. पंत गो. सुंदर ००. अवांतर (००). एकूण ३०.४ षटकांत सर्वबाद ८१. बाद क्रम : १-०, २-०, ३-१९, ४-५०, ५-५६, ६-६६, ७-६८, ८-८०, ९-८०, १०-८१. गोलंदाजी : पटेल १५-०-३२-५, अश्विन १५-३-४८-४, सुंदर ०.४-०-१-१.

भारत दुसरा डाव 

रोहित शर्मा नाबाद २५, शुभमन गिल नाबाद १५. अवांतर (९). एकूण ७.४ षटकांत बिनबाद ४९. गोलंदाजी : जॅक लीच ४-१-१५-०, ज्यो रुट ३.४-०-२५-०.

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडबीसीसीआय