Matthew Short 5 Wicket Haul: पहिल्या टी-२० सामना जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियावर दुसऱ्या इंग्लंडच्या संघाने पलटवार केला. कार्डिफच्या मैदानात रंगलेल्या रंगतदार सामन्यात यजमान इंग्लंडच्या संघाने पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाला ३ विकेट्सनी पराभूत केले. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी सलामीवीर मॅथ्यू शॉर्ट हा एका खास कामगिरीमुळे चर्चेत आला आहे.
एकट्यानं इंग्लंडचा अर्धा संघ केला गारद
ऑस्ट्रेलियाच्या या सलामीवीरानं बॉलिंग करताना खास विक्रमाला गवसणी घातली आहे. मॅथ्यू शॉर्टनं या सामन्यात गोलंदाजी करताना ३ षटकात २२ धावा खर्च करून इंग्लंडचा अर्धा संघ गारद केला. यासोबतच ऑस्ट्रेलियन ओपनरच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कधीच घडलं नाही ते या सलामीवीरानं करून दाखवलं आहे.
शॉर्टच्या नावे झाला ७ व्या गोलंदाजाच्या रुपात ५ विकेट्स घेण्याचा खास विक्रम
शॉर्ट ऑस्ट्रेलियाकडून सातव्या गोलंदाजाच्या रुपात गोलंदाजीसाठी आला होता. त्याने ३ षटकात २२ धावा खर्च करताना इंग्लंडचा सलामीवीर फिलिप सॉल्ट, लियाम लिविंगस्टोन, जॅकब बॅथल, सॅम करन आणि ब्रायडन कार्से यांची विकेट घेतली. पुरुष क्रिकेटच्या इतिहासात ७ व्या गोलंदाजाच्या रुपात पाच विकेट्स घेणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. एवढेच नाही तर तो आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील तो पहिला सलामीवीर आहे जो ५ विकेट्स हॉलच्या क्लबमध्ये सामील झालाय.
लियाम लिविंगस्टोनच्या तुफानी फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाची गाडी ट्रॅकवरुन घसरली
ऑस्ट्रेलियन संघाने या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग केली. जेक फ्रेजर-मॅकगर्क याच्या अर्धशतकासह जोश इंग्लिशनं केलेल्या ४२ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात १९३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघानं लियाम लिविंगस्टोनच्या तुफानी खेळीच्या जोरावर १९ व्या षटकातच ७ विकेट्स गमावत १९४ धावांचे टार्गेट पार केले. लियाम लिविंगस्टोन याने या सामन्यात ४७ चेंडूत ५ षटकार आणि ६ चौकाराच्या मदतीने ८७ धावांची दमदार खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने मालिकेत कमबॅक केले आहे.