इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या अॅशेस कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कमालीचा रंगतदार झाला. मंगळावारी आटोपलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर दोन विकेट्स राखून नाट्यमय विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडने विजयाच्या उंबरठ्यावर जवळपास धडक दिली होती. विजयाचा दरवाजा उघडण्यासाठी त्यांना केवळ दोन विकेट्सची गजर होतीत मात्र त्याचवेळी इंग्लंडचा स्टार खेळाडूच इंग्लंडसाठी खलनायक ठरला. मोक्याच्या क्षणी या खेळाडूनं एक झेल सोडला आणि तोच संपूर्ण सामन्यातील निर्णायक टर्निंग पॉईंट ठरला. आता अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या झालेल्या पराभवासाठी या खेळाडूला दोषी ठरवले जात आहे.
इंग्लंडने या सामन्यातील पहिल्या डावात ८ बाद ३९३ धावा कुटून डाव घोषित केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात ३८६ धावा काढल्या. त्यानंतर इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात २७३ धावांवरच गारद झाला. चौथ्या डावात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २८१ धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ८०.३ षटकांमध्ये २२७ धावांपर्यंत मजल मारताना ८ विकेट्स गमावल्या होत्या. विजयासाठी अजूनही ५४ धावांची गरज होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पराभव निश्चित वाटत होता. मात्र त्याचवेळी ८४ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर जे काही घडले, त्याची कुणी कल्पनाही केली नव्हती.
जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये समावेश असलेल्या बेन स्टोक्सने ऑस्ट्रेलियाच्या डावातील ८४ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर नाथन लायनचा झेल सोडला. नाथन लायन त्यावेळी केवळ २ धावांवर खेळत होता. नाथन लायनचं झेल सोडणं बेन स्टोक्स आणि इंग्लंडला खूपच महाग पडले. लायन आणि पॅट कमिन्सन यांच्या जोडीनं त्यानंतर इंग्लंडला कुठलंही यश मिळवू न देता सामना खेचून नेला. नाथन लायनचा झेल जेव्हा सुटला तेव्हा ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३७ धावांची गरज होती. मात्र लायनने त्यानंत नाबाद १६ धावांची खेळी करून इंग्लंडचा पराभव निश्चित केला. नाथन लायन आणि पॅट कमिन्स यांनी नवव्या विकेटसाठी ५५ धावांची अभेद्य भागीदारी करत सामन्याचा निकाल पलटवला.