England vs Ireland 3rd ODI: पॉल स्टीर्लिंग आणि अँड्य्रू बॅलबीर्नीए यांच्या वैयक्तिक शतकी खेळीनं आयर्लंडला तिसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडवर रोमहर्षक विजय मिळवून दिला. 2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेतही आयर्लंडनंइंग्लंडवर थरारक विजय मिळवला होता आणि याही वेळेला 329 धावांचे लक्ष्य आयर्लंडने पार केले. आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीगमधील ही पहिलीच मालिका आहे आणि इंग्लंडने सुरुवातीचे दोन सामने जिंकून ती आधीच खिशात घातली होती. तिसऱ्या सामन्यातही 328 धावांचा डोंगर उभा करून ते सहज जिंकतील, असे वाटले होते. पण, आयर्लंडच्या फलंदाजांनी त्यांना स्तब्ध केलं.
प्रत्युत्तरात पॉल स्टीर्लिंग आणि अँड्य्रू बॅलबीर्नीए यांनी खिंड लढवली. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेला हा सामना आयर्लंडनं 49.5 षटकांत खिशात घातला. स्टीर्लिंगनं 128 चेंडूंत 9 चौकार व 6 षटकार खेचून 142 धावा चोपल्या, तर बॅलबीर्नीएनं 112 चेंडूंत 12 चौकारांसह 113 धावांची संयमी खेळी केली. केव्हीन ओ'ब्रायननं अखेरच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर एक धाव घेत आयर्लंडचा 7 विकेटनं विजय निश्चित केला. या विजयानं आयर्लंडने वर्ल्ड कप सुपर लीगच्या गुणतालिकेत खाते उघडले.