England vs Pakistan 1st Test: शान मसूदच्या ( 156) शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघानं पहिल्या डावात 326 धावा उभ्या करून इंग्लंडसमोर आव्हान उभे केले. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना इंग्लंडचा पहिला डाव 219 धावांत गुंडाळून 107 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानला वर्चस्व गाजवण्याची संधी होती, पंरतु इंग्लंडच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करताना पाकिस्तानला धक्के दिले. तिसऱ्या दिवशी तब्बल 14 विकेट्स पडल्या.
इंग्लंडकडून तिसऱ्या दिवशी ओली पॉप ( 62) आणि जोस बटलर ( 38) यांनी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. त्यांना स्टुअर्ट ब्रॉड ( 29*) साथ दिली, परंतु इंग्लंडला पहिल्या डावात 219 धावा करता आल्या. 107 धावांच्या आघाडीसह पुन्हा मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानच्या फलंदाजांना मात्र यावेळी साजेशी खेळी करता आली नाही. पहिल्या डावातील शतकवीर शान मसूद भोपळाही फोडू शकला नाही. स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स, बेन स्टोक्स यांनी पाकिस्तानला धक्के दिले. त्यांचे 8 फलंदाज अवघ्या 137 धावांत माघारी परतले आहे. पाकिस्ताननं तिसऱ्या दिवसअखेर 244 धावांची आघाडी घेतली आहे. यासीर शाह आणि मोहम्मद अब्बास खेळत आहेत.