ENG vs PAK Test Series: इंग्लंडच्या कसोटी संघाचा सध्याचा पाकिस्तान दौरा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. आता मुलतानमध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजेच गुरुवारी गोळीबाराचा आवाज ऐकू आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुल्तानमध्ये ज्या हॉटेलपासून ही घटना घडली, ते इंग्लिश टीमच्या हॉटेलपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. विशेष म्हणजे इंग्लिश कसोटी संघ १७ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. असे असताना ही घटना घडल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.
पाक पोलिसांनी चौघांना केली अटक
इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, हा गोळीबार दोन गटांमध्ये झाला असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. इंग्लंडचा संघ सरावासाठी हॉटेलमधून बाहेर पडण्यापूर्वी गोळीबाराचा आवाज ऐकू आला. या घटनेचा इंग्लंड संघाच्या सराव सत्रावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे अहवालात म्हटले आहे. सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान दौऱ्यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंना राष्ट्रपती स्तरावरील सुरक्षा पुरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मार्क वूड इंग्लंडच्या प्लेइंग ११ मध्ये
उभय संघांमधील दुसऱ्या कसोटीबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यासाठी इंग्लंडने मार्क वूडचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केला आहे. रावळपिंडी येथील पहिल्या कसोटीत गुडघ्याला दुखापत झालेल्या अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनच्या जागी वुडने संघात स्थान घेतले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ७४ धावांनी विजय मिळवला होता. अशा परिस्थितीत इंग्लंडचा संघ हा सामना जिंकल्यास कसोटी मालिकेवर कब्जा करेल. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले की, 'ताशी १५० किलोमीटर वेगाने गोलंदाजी करणारा असा खेळाडू तुमच्या संघात असणे हा मोठा बोनस आहे. वूड ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, तो आमच्यासाठी खूप मोठा असणार आहे. २० विकेट्स घेण्याच्या आमच्या क्षमतेत तो भर घालणार आहे.
२००९ मध्ये श्रीलंकेच्या झाला होता संघावर हल्ला
या गोळीबारामुळे २००९च्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. विशेष म्हणजे त्याच वर्षी ३ मार्च रोजी श्रीलंकेच्या संघावर भीषण हल्ला झाला होता. श्रीलंकेचे खेळाडू त्यांच्या हॉटेलमधून लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये कसोटी सामना खेळण्यासाठी जात असताना श्रीलंकेच्या संघावर हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात तत्कालीन कर्णधार महेला जयवर्धने, कुमार संगाकारा, अजंथा मेंडिस, थिलन समरवीरा, चामिंडा वास असे खेळाडू जखमी झाले होते. या हल्ल्यात पाकिस्तान पोलिसांच्या ६ जवानांसह ८ जण ठार झाले होते.