इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा कसोटी सामना आजपासून सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं 4 विकेट्स राखून विजय मिळवताना तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात सुरू झालेल्या या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेकडे सर्वांचे लक्ष होते. कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) काही नियम तयार केले होते, परंतु ते अंगवळणी पडण्यास खेळाडूंना अजूनही वेळ लागणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सामन्यात नियमांचे उल्लंघन झालेले पाहायला मिळाले. त्यामुळेच इंग्लंड क्रिकेट मंडळानं कठोर पाऊल उचलताना प्रमुख जलदगती गोलंदाजाला संघाबाहेर केले.
पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिज संघानं विजयाचा मान पटकावला. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेले 200 धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजनं 4 विकेट्स राखून सहज पार केले. जेरमेन ब्लॅकवूड ( 95) हा या विजयाचा शिल्पकार ठरला. या पराभवामुळे इंग्लंडच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला. इंग्लंडचा पहिला डाव 204 धावांत गुंडाळला. वेस्ट इंडिजनं प्रत्युत्तरात 318 धावा करताना 114 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडने दुसऱ्या डावात 313 धावा करून 200 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवात निराशाजनक झाली. पण, ब्लॅकवूडनं एकाकी खिंड लढवून विंडीजचा विजय पक्का केला. विंडीजनं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
दुसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. बायो-सिक्यूरच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जोफ्रा आर्चरला आजच्या सामन्यातून वगळण्यात आले आहे. आता त्याला पाच दिवस आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे. त्या काळात त्याची दोन वेळा कोरोना टेस्ट होईल आणि ती निगेटिव्ह आल्यानंतर त्याला खेळण्याची संधी मिळेल.
''झालेल्या चुकीबद्दल मी माफी मागतो. मी स्वतःलाच नव्हे, तर संपूर्ण संघ आणि व्यवस्थापकीय सदस्यांना संकटात आणले. माझी चूक मी मान्य करतो आणि सर्वांची माफी मागतो,''असे आर्चर म्हणाला.