England vs West Indies 3rd Test: इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडनं वर्चस्व गाजवले. जोस बटलर आणि ऑली पोप यांनी दमदार भागीदारी करताना संघाला पहिल्या दिवसअखेर 4 बाद 258 धावांपर्यंत मजल मारून दिली. विंडीजनं या सामन्यासाठी संघात 140 किलो वजनाचा फिरकीपटू रहकीम कोर्नवॉल याला संधी दिली. पहिल्या दिवशी रहकीमनं विकेट मिळवली नसली तरी त्यानं घेतलेला अफलातून झेल, हा पहिल्या दिवसाचा चर्चेचा विषय ठरला.
नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. केमार रोचनं पहिल्याच षटकात इंग्लंडचा सलमीवीर डॉम सिब्ली याला बाद केले. कर्णधार जो रूट ( 17) धावबाद आणि बेन स्टोक्स ( 20) यांनाही फार कमाल दाखवता आली नाही. रोरी बर्न्स आणि ऑली पोप यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर बर्न्स माघारी परतला. स्लीमध्ये उभ्या असलेल्या रहकीमनं चपळाईनं त्याचा झेल टिपला. बर्न्स 57 धावा करून माघारी परतला. त्यानंतर पोप आणि बटलर ही जोडी खेळपट्टीवर नांगर रोवून बसली.
दोघांनी दिवसअखेर इंग्लंडचा एकही फलंदाज बाद होऊ दिला नाही. पोप 142 चेंडूंत 11 चौकारांसह 91 धावांवर, तर बटलर 120 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 56 धावांवर खेळत आहे.
पाहा व्हिडीओ...