लाहोर : साडेतीनशे पार धावांचे लक्ष्य उभारून इंग्लंडच्या संघाला ऑस्ट्रेलियन जोश इंग्लिस चांगलाच भारी पडला. ८६ चेंडूतील नाबाद १२० धावांच्या त्याच्या झंझावाती खेळीमुळे इंग्लंडने दिलेले ३५२ धावांचे लक्ष्य कांगारूंनी ४७.३ षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात लिलया पेलले. सामन्याला कलाटणी देणाऱ्या या खेळीमुळे इंग्लिसला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलेे.
नाणफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडने सलामीवीर बेन डकेटच्या १६५ धावांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर ५० षटकांत ८ बाद ३५१ धावांचे लक्ष्य उभारले. सुरुवातीला झालेल्या पडझडीनंतर डकेटने अनुभवी ज्यो रुटला (६८ धावा) सोबत १५७ धावांची मॅरेथॉन भागीदारी केली. हे दोघे खेळत असताना इंग्लंड चारशे धावांचा टप्पा सहज पार करणार असाच सर्वांनी अंदाज बांधला होता. पण यानंतर ठराविक अंतराने कांगारूंकडून इंग्लंडला धक्के मिळाले. ऑस्ट्रेलियाकडून बेन ड्वारशुइसने सर्वाधिक ३ तर ॲडम झम्पा आणि मार्नस लाबुशेन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
प्रत्युत्तरात कांगारूंची सुरुवात खराब झाली. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या २७ धावांवरच त्यांचे दोन फलंदाज तंबूत परतले होते. पण मॅथ्यु शॉर्ट (६३) आणि मार्नस लाबुशेन (४७) यांनी ९५ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मात्र १२ धावांच्या अंतरात हे दोघेही स्थिरावलेले फलंदाज बाद झाल्याने ऑस्ट्रेलिया अडचणीत सापडला होता. यानंतर इंग्रजांना इंग्लिसकडून फलंदाजीचे धडे मिळाले. यष्टिरक्षक फलंदाज ॲलेक्य कॅरीला (६९) सोबत घेत जोश इंग्लिसने ऑस्ट्रेलियाचा विजय दृष्टिपथात आणला. कॅरी बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने इंग्लंडला १५ चेंडूत ३२ धावांचा प्रसाद देत विजयी सोपस्कार झटक्यात पूर्ण केले. इंग्लंडकडून मार्क वुड, जोफ्रा आर्चर, ब्रायडन कार्स, आदील रशीद, लियाम लिव्हिंगस्टोन यांना प्रत्येकी एक बळी घेता आला.
संक्षिप्त धावफलकइंग्लंड : ५० षटकांत ८ बाद ३५१ धावा (बेन डकेट १६५, ज्यो रूट ६८, जोस बटलर २३, जोफ्रा आर्चर नाबाद २१). गोलंदाजी : बेन ड्वारशुइस ३/६६, ॲडम झम्पा २/६४, लाबुशेन २/४१, मॅक्सवेल १/५८.ऑस्ट्रेलिया : ४७.३ षटकांत ५ बाद ३५६ धावा (जोश इंग्लिस नाबाद १२०, ॲलेक्स कॅरी ६९, मॅथ्यू शॉर्ट ६३, मार्नस लाबूशेन ४७, ग्लेन मॅक्सवेल नाबाद ३२). गोलंदाजी : आदिल रशीद १/४७, लियाम लिव्हिंगस्टोन १/४७, ब्रायडन कार्स १/६९, मार्क वूड १/७५, आर्चर १/८२.