पोर्ट एलिजाबेथ : इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा तिसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी एक डाव आणि ५३ धावांनी पराभव करीत चार सामन्यांच्या मालिकेत २-१ भक्कम आघाडी घेतली.
दक्षिण आफ्रिकेसाठी केशव महाराज (७१) व डेन पीटरसन (३९*) यांनी अखेरच्या गड्यासाठी ९९ धावांची भागीदारी केली. सॅम कुरेनने मिड ऑनवरून थेट थ्रो करीत ही भागीदारी फोडली. द. आफ्रिकेचा डाव २३७ धावांत गारद झाला. महाराज व पीटरसन यांची भागीदारी आफ्रिकेतील सर्वोत्तम ठरली. अन्य फलंदाज मात्र अपयशी ठरले. आफ्रिकेच्या अखेरच्या ४ फलंदाजांनी धावसंख्येत १३५ धावांची भर घातली. हा गेल्या आठ कसोटींतील द. आफ्रिकेचा सातवा पराभव होता. यजमानांनी इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना जिंकला. तेव्हा संघ व्यवस्थापनाने संघात बदल केले होते.
पहिली कसोटी गमावल्यानंतर इंग्लंडने केपटाऊन कसोटी १८९ धावांनी जिंकली. तिसºया कसोटीत इंग्लंडने पूर्णपणे वर्चस्व राखले. ओली पोपच्या शतकानंतर फिरकीपटू डोम बेसने पहिल्या डावात ५ बळी मिळवले. विशेष म्हणजे १९९९-२००० पासून इंग्लंडने द. आफ्रिकेत कसोटी मालिका गमावलेली नाही.