ICC World Test Championship Standings - ०-१ अशा पिछाडीनंतर यजमान इंग्लंडने जबरदस्त कमबॅक केले आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. तिसऱ्या व अंतिम कसोटीत इंग्लंडने ९ विकेट्सने विजय मिळवताना टीम इंडियाच्या कसोटी वर्ल्ड कप फायनल खेळण्याच्या आशा अधिक पल्लवीत केल्या. आफ्रिकेला सलग दोन कसोटींत हार मानावी लागल्याने त्यांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतील अव्वल स्थान गमवावे लागले. ऑस्ट्रेलिया सर्वाधिक ७० टक्क्यांसह आता अव्वल स्थानावर सरकली आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला उर्वरित कसोटी जिंकून लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध जेतेपदाचा सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.
दी ओव्हलवर झालेल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने विजयासाठीचे १३० धावांचे लक्ष्य सहज पार केले. आफ्रिकेचा पहिला डाव ११८ धावांवर गुंडाळला गेला. ऑली रॉबिन्सनने ५, तर स्टुअर्ट ब्रॉडने ४ विकेट्स घेतल्या. इंग्लंडला पहिल्या डावात १५८ धावाच करता आल्या. ऑली पोपने सर्वाधिक ६७ धावा केल्या. आफ्रिकेच्या मार्को येनसनने ५, कासिगो रबाडाने ४ विकेट्स घेतल्या. आफ्रिकेचा दुसरा डावही १६९ धावांवर गडगडला. बेन स्टोक्स व स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी ३ आणि जेम्स अँडरसन व रॉबिन्सन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. अॅलेक्स लीस ( ३९), झॅक क्रॅव्हली ( ६९*) यांनी १३० धावांचे लक्ष्य सहज पार करून दिले. या पराभवामुळे आफ्रिकेची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ६० टक्क्यांसह ते आता दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. श्रीलंका आणि भारत अनुक्रमे ५३.३३ व ५२.०८ टक्क्यांसह तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.
सहा कसोटी, सहा विजय अन्...
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या पर्वात भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. न्यूझीलंडने WTC चे जेतेपद नावावर केले होते. भारतीय संघ डिसेंबरमध्ये बांगलादेश दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी जाणार आहे , तर फेब्रुवारी २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येणार आहे. जून ३०मध्ये जागतिक कसोटी स्पर्धा संपतेय. सध्या भारतीय संघ ५२.०८ टक्केवारीसह चौथ्या क्रमांकावर आहे आणि त्यांना उर्वरित सहा कसोटी जिंकाव्या लागतील, तर भारताची टक्केवारी ६८.०६ इतकी होईल.