साऊथम्पटन: कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे ११७ दिवस स्थगित असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुधवारपासून सुरू झाले. जैवसुरक्षित स्टेडियमवर कसोटीत चौथ्या स्थानी असलेल्या इंग्लंड संघाची लढत आठव्या स्थानी असलेल्या वेस्ट इंडिजशी आहे. वेस्ट इंडिजविरूद्ध यजमानांनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडने चहापानापर्यंत १७.४ षटकात एक बाद ३५ धावा केल्या होत्या.कोरोनाचा धोका लक्षात घेत आयसीसीने घालून दिलेल्या नव्या नियमावलीनुसार प्रेक्षकांविना मालिका खेळवली जात आहे. कोरोनामुळे नवे नियमही लागू करण्यात आले आहेत.पावसामुळे पहिल्या दिवसाच्या खेळात एकाही चेंडूचा खेळ होण्याआधीच उपाहाराची विश्रांती घेण्यात आली. सुरुवातीला पावसाच्या सरी आणि परिणामी ओल्या असलेल्या आऊटफिल्डमुळे नाईलाजाने खेळाडूंना ‘लंच ब्रेक’ घ्यावा लागला. भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सामना सुरू होणार होता, पण हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरींमुळे नाणेफेकही लांबणीवर पडली. अखेर तीन तास विलंबाने खेळ सुरु झाला. इंग्लंडने या सामन्यातून स्टुअर्ट ब्रॉड याला बाहेर ठेवले असून विंडीज संघात रहकीम कॉर्नवाल याला स्थान मिळू शकले नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सुमारे चार महिन्यानंतर पुनरागमन होत आहे. त्या अनुषंगाने अनेक सोईसुविधा करण्यात आल्या आहेत. पण त्याचसोबत निसर्गाची साथ हादेखील या सामन्याच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असणार आहे. (वृत्तसंस्था)
‘ब्लॅक व्हॉईस मॅटर’ला पाठिंबाविंडीजच्या खेळाडूंनी मैदानात गुडघ्यावर बसून वर्णद्वेषाविरुद्ध ‘ब्लॅक व्हॉईस मॅटर’ला पाठिंबा दर्शवला. दोन्ही संघातील खेळाडूंनी स्वत:च्या टी शर्टवर ‘ब्लॅक व्हॉईस मॅटर’चा लोगोदेखील लावला आहे. मे मध्ये आफ्रिकन वंशाचा अमेरिकन नागरिक जॉर्ज फ्लॉयड याची पोलीस अधिकाऱ्याने हत्या केली होती. तेव्हापासून वर्णद्वेषाविरुद्ध आंदोलन सुरू आहे. त्याआधी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली म्हणून एक मिनिटाचे मौन पाळण्यात आले.प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत हा उपाय...कोरोनाचा धोका संपत नाही तोपर्यंत क्रिकेट सामने प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे वातावरण निर्मितीसाठी प्रेक्षकांचा आवाज आणि संगीत ध्वनी स्टेडियममध्ये वाजवण्यात येत आहेत.कोविड योद्ध्यांना सलाम...पहिल्या दिवसाआधी इंग्लंडचे खेळाडू विशिष्ट प्रकारचे ट्रेनिंग टी शर्र्ट घालून मैदानात सरावासाठी उतरले. शर्टवर करोनाविरुद्ध लढणाºया काही निवडक लोकांची नावे लिहिण्यात आली होती. ही नावे स्थानिक क्रिकेट क्लबद्वारे नामांकित केलेल्या मुख्य कर्मचाऱ्यांची होती. त्यात शिक्षक, डॉक्टर्स, नर्स, समाजसेवक अशा अनेकांचा समावेश होता. इंग्लंडचा नियमित कसोटी कर्णधार ज्यो रुट म्हणाला, ‘कठीण परिस्थितीत देशासाठी काम केलेल्या कोविड योद्ध्यांचा सन्मान आम्हाला करायचा होता. त्यामुळे आम्ही या मालिकेचा उपयोग करुन त्यांचा सन्मान केला.’