भारतीय महिला क्रिकेट संघाच्या फलंदाजांना पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयश आलं. महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी या तिरंगी मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण, टीम इंडियाला शुक्रवारी इंग्लंड महिला संघाकडून हार पत्करावी लागली. भारताची स्मृती मानधना वगळता अन्य फलंदाजांनी निराश केले. भारतानं विजयासाठी ठेवलेलं 124 धावांचं माफक लक्ष्य इंग्लंडनं 18.5 षटकांत 6 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. या तिरंगी मालिकेत भारताला तीन सामन्यांत केवळ एकच विजय मिळवता आला आहे.
प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला सहाव्या षटकात मोठा धक्का बसला. सलामीवीर शेफाली वर्मा ( 8) धावा करून माघारी परतली. त्यानंतर स्मृती आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांनी दुसऱ्या विकेटसाठी खिंड लढवली, परंतु त्यांनाही मोठी खेळी साकारता आली नाही. स्मृती 45 धावा करून बाद झाली. त्यानंतर टीम इंडियाचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. जेमिमा ( 23) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर ( 14) वगळता अन्य फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. इंग्लंडच्या अॅमी श्रुबसोलेनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांचे आघाडीचे तीन फलंदाज 28 धावांवर माघारी परतावे. नताली स्कीव्हरने अर्धशतकी खेळी करत इंग्लंडला विजयपथावर आणले. फ्रॅन विल्सननं नाबाद 20 धावा करताना इंग्लंडचा विजय पक्का केला. भारताच्या राजेश्वरी गायकवाडनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.