Join us  

इंग्लंडचा लंकेवर मोठा कसोटी विजय, विदेशात १३ सामन्यानंतर चाखला विजयाचा स्वाद

इंग्लंडने श्रीलंकेला शुक्रवारी पहिल्या कसोटीत तब्बल २११ धावांनी पराभूत केले. यासह इंग्लंडने विदेशात मागील १३ सामन्यात पहिलाच विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 5:19 AM

Open in App

गॉल(श्रीलंका) - इंग्लंडने श्रीलंकेला शुक्रवारी पहिल्या कसोटीत तब्बल २११ धावांनी पराभूत केले. यासह इंग्लंडने विदेशात मागील १३ सामन्यात पहिलाच विजय मिळवला. डावखुरा यशस्वी फिरकीपटू रंगना हेरथ बाद होणारा अखेरचा फलंदाज ठरला. हा त्याचा अखेरचा सामना होता. त्याने निवृत्तीची घोषणा या सामन्याआधीच केली होती. परंतु, श्रीलंका संघ आपल्या यशस्वी फिरकीपटूला विजयी निरोप देण्यात अपयशी ठरला.श्रीलंकेपुढे विजयासाठी ४६२ धावांचे आव्हान होते. त्यांचा संघ चौथ्या दिवशी २५० धावांत गारद झाला. इंग्लंडकडून मोईन अली याने चार तसेच जॅक लीचने तीन गडी बाद केले. इंग्लंडने पहिल्या डावात १३९ धावांची आघाडी घेतली होती. गुरुवारी कीटोन जेनिंग्सने नाबाद १४६ धावांची संयमी खेळी करताच ६ बाद ३२२ धावांवर दुसरा डाव घोषित केला होता. लंकेने शुक्रवारी बिनबाद १५ वरुन पुढे खेळ सुरू केला. सलामीचा कौशल सिल्वा आणि दिमूथ करुणारत्ने यांनी पहिल्या तासात दमदार इंग्लिश मारा समर्थपणे खेळून काढला. आक्रमक फटकेबाजीच्या नादात मात्र दोघांनीही स्वत:चा बळी दिला. पायचित होण्याआधी कौशलने ३० आणि करुणारत्ने याने २६ धावांचे योगदान दिले. धनंजय डिसिल्वा (२१)बेन स्टोक्सच्या चेंडूवर कर्णधार जो रुटकडे झेल देत परतला.उपाहारानंतर कुसाल मेंडिस(४५) हा मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला तर मांसपेशी ताणल्या गेल्याने गुरुवारी मैदानावर न येऊ शकलेला कर्णधार दिनेश चांदीमल (११) त्रिफळाचीत झाला. निरोशन डिकवेला (१६) हा अखेरच्या सत्रात पहिल्या चेंडूवर मोईन अली करवी स्लिपमध्ये झेलबाद होऊन परतला तर १८ धावांवर जीवदान मिळालेला अँजेलो मॅथ्यूज(५३) अर्धशतक पूर्ण होताच बाद झाला.अकिला धनंजय (८) आणि दिलरुवान परेरा (३०) बाद झाल्यानंतर लंकेच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले. हेरथ पाच धावा काढून धावबाद झाला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकइंग्लंड (पहिला डाव) : ९७ षटकात सर्वबाद ३४२ धावा.श्रीलंका (पहिला डाव) : ६८ षटकात सर्वबाद २०३ धावा.इंग्लंड (दुसरा डाव) : ९३ षटकात ६ बाद ३२२ धावा (घोषित) (किटॉन जेनिंग्स नाबाद १४६, बेन स्टोक्स ६२; रंगना हेराथ २/५९, दिलरुवान परेरा २/९४.)श्रीलंका (दुसरा डाव) : ८५.१ षटकात सर्वबाद २५० धावा (अँजेलो मॅथ्यूज ५३, कुसाल मेंडिस ४५; मोइन अली ४/७१, जॅक लीच ३/६०.) 

टॅग्स :श्रीलंकाइंग्लंड