मॅन्चेस्टर : यजमान इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरचा कसोटी सामना मंगळवारी २६९ धावांनी जिंकून कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.तब्बल चार महिन्यानंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा झाला. पहिल्या कसोटीत इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र दुसऱ्या आणि तिसºया सामन्यात इंग्लंडने दमदार मुसंडीसह मालिकेत बाजी मारली. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने या सामन्यात ५०० कसोटी बळींचा टप्पा गाठला.
इंग्लंडने दुसºया डावात विजयासाठी ३९९ धावांचे आव्हान दिल्यानंतर तिसºया दिवसअखेरीस विंडीजची सुरुवात खराब झाली होती. दहा धावात दोन बळी गेल्यानंतर चौथ्या दिवशी संपूर्ण दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. आज अखेरच्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांना विजयासाठी संघर्ष करावा लागेल, असा अंदाज व्यक्त होत होता. तथापि असे घडले नाही.विंडीजच्या फलंदाजांना पाठोपाठ धक्के देत इंग्लंडच्या गोलंदाजांनी चहापानाआधी विजयावर शिक्कामोर्तब केले. वेस्ट इंडिजकडून दुसºया डावात शाय होप ३१ आणि शामार ब्रुक्स २२ यांनी थोडा प्रतिकार केला.
ब्रुक्स आणि होप माघारी परतल्यानंतर विंडीजच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली. ख्रिस वेक्सने पाच तर ब्रॉडने चार गडी बाद करीत विंडीजचा दुसरा डाव १२९ धावांत संपवला. इंग्लंड ३० जुलैपासून आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वन-डे मालिका खेळेल. यानंतर पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळणार आहे. (वृत्तसंस्था)
स्टुअर्ट ब्रॉडचे ५०० बळीस्टुअर्ट ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळींचा टप्पा गाठला. विंडीजच्या पहिल्या डावात स्टुअर्ट ब्रॉडने ३१ धावात ६ बळी घेतले. दुसºया डावातही चार गडी ब्रॉडनेच बाद केले. तिसºया दिवशी तो ४९९ वर पोहोचला होता. चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर ५०० व्या बळीसाठी प्रतीक्षा लांबली होती. आज क्रेग ब्रेथवेटचा बळी घेत त्याने हा विक्रम केला. ५०० बळी टिपणारा ब्रॉड सातवा गोलंदाज ठरला. याआधी वेस्ट इंडिजचा कर्टनी वॉल्श (२००१), आॅस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (२००४), श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (२००४), आॅस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा (२००५), भारताचा अनिल कुंबळे (२००६), इंग्लंडचा जेम्स अँडरसन (२०१७) यांनी हा पराक्रम केला आहे.