Join us  

Ben Stokes Last ODI : टाळ्यांचा कडकडाटात बेन स्टोक्सने वन डे क्रिकेटचा निरोप घेतला, दक्षिण आफ्रिकेने विक्रमी विजय मिळवला

Ben Stokes Last ODI : इंग्लंडचा वर्ल्ड कप हिरो बेन स्टोक्स याने काल अखेरची वन डे लढत खेळली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 12:25 PM

Open in App

Ben Stokes Last ODI : इंग्लंडचा वर्ल्ड कप हिरो बेन स्टोक्स याने काल अखेरची वन डे लढत खेळली. इंग्लंडला पहिला वन डे वर्ल्ड कप जिंकून देण्यात स्टोक्सचा सिंहाचा वाटा होता आणि त्याची अखेरची मॅच पाहण्यासाठी स्टेडियमनही फुल्ल होते. पण, इंग्लंडला  वर्ल्ड कप नायकाला विजयी निरोप देता आला नाही. स्टोक्सला या सामन्यात एकही विकेट घेता आली नाही, तर 5 धावाच केल्या. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 62 धावांनी जिंकून मालिकात 1-0 अशी आघाडी घेतली. स्टेडियमसोडताना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्टोक्सला निरोप दिला. स्टोक्सने चाहत्यांमध्ये उपस्थित असलेल्या एका चिमुरड्याला त्याची कॅप भेट म्हणून दिली आणि त्यावर त्याने स्वाक्षरीही केली होती. स्टोक्सने 105 वन डे सामन्यांत 3 शतकं व 21 अर्धशतकांसह 2924 धावा केल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 5 बाद 333 धावा केल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आफ्रिकेच्या या डावात एकही षटकार लागला नाही. वन डे क्रिकेटमध्ये एकही षटकार न मारता एखाद्या संघाने केलेली ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली. यापूर्वी 2019मध्ये श्रीलंकेने वेस्ट इंडिजविरुद्ध 8 बाद 345 धावा केल्या होत्या. 2011 मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 बाद 333 धावा केल्या होत्या. काल झालेल्या या सामन्यात रॅसी व्हॅन डेर ड्युसेनने 134 धावांची खेळी केली. येनमन मलान ( 57) व एडन मार्कराम ( 77) यांनी अर्धशतक झळकावून आफ्रिकेला 333 धावांपर्यंत पोहोचवले.

इंग्लंडकडून जेसन रॉय ( 43) व जॉनी बेअरस्टो (  63) यांनी दमदार सुरूवात केली. पण, त्यांची 102 धावांची भागीदारी संपुष्टात आल्यानंतर इंग्लंडचा डाव कोसळला. जो रूटने 77 चेंडूंत 86 धावा करताना नंतर एकट्याने संघर्ष सुरू ठेवला होता. बेन स्टोक्स 5 धावांवर मार्करामच्या गोलंदाजीवर LBW झाला. एऩरिच नॉर्खियाने 4 विकेट्स घेताना इंग्लंडचा डाव 46.5 षटकांत 271 धावांवर गुंडाळला. 

टॅग्स :बेन स्टोक्सइंग्लंडद. आफ्रिका
Open in App