England World Record, ENG vs WI 2nd Test: वेस्ट इंडिजविरुद्धची पहिली कसोटी इंग्लंडने एकतर्फी जिंकली. दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनची ही शेवटची कसोटी होती. त्याला शेवटच्या कसोटीत विजयी निरोप मिळाला. त्यानंतर आज दुसऱ्या कसोटीला सुरुवात झाली. वेस्ट इंडिजच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि इंग्लंडला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. इंग्लंडच्या सलामीवीरांनी ही संधी अजिबात दवडली नाही. त्यांनी तुफान सुरुवात केली आणि सामन्याच्या अवघ्या २६ चेंडूत कसोटी क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचला.
१४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला हा विक्रम
इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या कसोटीत एक मोठा विक्रम केला. नॉटिंगहॅम कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांनी असे काही केले जे कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच घडले. इंग्लंड संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध केवळ ४.२ षटकांत ५० धावांचा टप्पा पार केला. त्यांनी एक विश्वविक्रम रचला. यापूर्वीही हा विक्रम इंग्लंडच्याचझ नावावर होता. १९९४ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडने ४.३ षटकात ५० धावांचा टप्पा ओलांडला होता, पण आता ३० वर्षांनंतर त्यांनी स्वत:चा विश्वविक्रम मोडला.
डकेटने घेतला विंडिजच्या गोलंदाजांचा समाचार
नॉटिंगहॅम कसोटीत इंग्लंडची सुरुवात खूपच खराब झाली होती. पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्यांनी पहिली विकेट गमावली. क्राउली शून्यावर बाद झाला. पण त्यानंतर ऑली पोपसह बेन डकेटने पुढच्या २३ चेंडूत संघाची धावसंख्या पन्नासच्या पुढे नेली. बेन डकेटने केवळ ३२ चेंडूत आपलेही अर्धशतक झळकावले. त्याचे हे सर्वात वेगवान कसोटी अर्धशतक ठरले. आक्रमक फलंदाजी करत या खेळाडूने ओली पोपसोबत १०६ धावांची भागीदारी केली. बेन डकेट ५९ चेंडूत ७१ धावा करून बाद झाला. त्याची विकेट शमर जोसेफने घेतली. डकेटने एकूण १४ चौकार मारले.