मुंबई : युवराज सिंगने भारतासाठी अतुलनीय असे योगदान दिले आहे. 2011च्या विश्वचषक विजयात युवराजचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळेच या विश्वचषकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार युवराजला देण्यात आला होता. पण युवराज अजूनही आठवतो तो त्याच्या सहा षटकारांसाठी. 2007च्या ट्वेन्टी-20 विश्वचषकात युवराजने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडला एकाच षटकार सहा षटकार लगावले होते. याच ब्रॉडने एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली आणी ती युवराजला टॅग केली. यानंतर क्रिकेट चाहत्यांनी ब्रॉडला चांगलेच ट्रोल केले आहे.
सध्या इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये कसोटी सामना सुरु आहे. इंग्लंडच्या सॅम कुरनने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात 64 धावांती खेळी साकारली. या 64 धावांच्या खेळीत कुरनने सहा षटकार लगावले. यावेळी ब्रॉडला युवराजच्या षटकारांची आठवण झाली आणि त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहीले की, " तुम्ही असा एक खेळाडू पाहिला आहे का, ज्याने सहा षटकारांनंतर पहिला चौकार लगावला असेल..." या पोस्टनंतर ब्रॉड हा सोशल मीडियावर टीकेचा धनी ठरत आहे.