अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
गतविजेत्या इंग्लंडचा यंदाच्या विश्वचषकात चांगलाच बॅन्ड वाजला. पाचपैकी एकच सामना जिंकल्याने हा संघ बाहेर पडण्याच्या स्थितीत आहे. पण काही तांत्रिक बाबींमुळे त्यांची एक्झिट लांबू शकते. इंग्लंडला उपांत्य फेरीची शक्यता तपासण्यासाठी उर्वरित सामने जिंकावे लागतीलच शिवाय अन्य संघांच्या निकालांवरही विसंबून रहावे लागेल. विश्वविजेत्यांचा हा ‘डाउनफॉल’ आश्चर्याचा धक्का देणारा आहे. कागदावर हा संघ बलाढ्य आहे. अकराव्या स्थानापर्यंत फलंदाजी भक्कम आहे, पण डेव्हिड मलानचा अपवाद वगळता मैदानात सर्वचजण ‘फ्लॉप’ ठरले.
दिग्गज जोस बटलर, बेन स्टोक्स, बेअरस्टो, ज्यो रूट, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन हे सर्वजण आल्यापावली माघारी फिरताना दिसतात. गोलंदाजही काही करू शकलेले नाहीत. बेन स्टोक्स सुरुवातीला तीन सामने का खेळला नाही, हे समजण्यापलीकडचे आहे. विश्वचषकासारख्या स्पर्धेत आपण विजेते या नात्याने वर्चस्व गाजवायलाच हवे ही बाब ध्यानात ठेवून सुरुवातीचे सामने जिंकून देण्याची जबाबदारी त्याच्यावर असताना त्याने राखीव बाकावर बसणे का पसंत केले? फिटनेसची समस्या असेल तर इतका वेळ ती लपवायला नको होती. इंग्लंडकडे आता गमावण्यासारखे फारसे काही नसल्याने जाता जाता हा संघ इतरांचे गणित बिघडवू शकतो. तेव्हा भारताने त्यांना डोके वर काढू देण्याची चूक करू नये. दुसरीकडे भारतीय फलंदाज सर्वच संघांवर वरचढ झाले आहेत. रोहित आणि विराट यांची स्फोटक फलंदाजी आणि सोबतीला शुभमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर यांचीही साथ मिळत आहे. रवींद्र जडेजाने संघाला संतुलन प्रदान केले आहे. भारताला आता उपांत्य फेरीची काळजी नाही.
संघाचे दहा गुण आहेत. उर्वरित चार सामन्यांपैकी एक जरी विजय मिळाला तरी नुकसान होणार नाही. पण याचा अर्थ सामना गमावणे असा होत नाही. विराटकडून शतकी खेळीची अपेक्षा असेल. माझ्या मते जसप्रीत बुमराह ‘एक्स फॅक्टर’ ठरू शकेल. लखनौची खेळपट्टी फिरकीला मदत करणारी असल्याचे जाणवते तरीही बुमराहचा मारा येथे निर्णायक ठरू शकेल. इंग्लंड तर वेगवान आणि फिरकी माऱ्यापुढेही ढेपाळत आहे.
बुमराहचा मारा त्यांच्यासाठी कर्दनकाळ ठरू शकतो. भारताला आपली विजयी घोडदौड सुरू ठेवायची झाल्यास लय, आत्मविश्वास, फोकस आणि खेळावरील पकड कायम राखणे गरजेचे ठरणार आहे.
Web Title: England's 'downfall' is a shocker, but may spoil the math of other teams
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.