नवी दिल्ली : सध्या आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. जवळपास सर्वच संघांनी सहा ते सात सामने खेळले असून रोज गुणतालिकेत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आताच्या घडीला १० गुणांसह चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) संघ अव्वल स्थानावर आहे. महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वातील चेन्नईने सातपैकी पाच सामने जिंकले आहेत. काल चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सचा (CSK vs KKR) ४९ धावांनी मोठा पराभव करून गुणतालिकेत भरारी घेतली. अशातच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने आयपीएलबद्दल एक भाकित केले आहे.
दरम्यान, आयपीएल २०२३ चा चॅम्पियन महेंद्रसिंग धोनीचा चेन्नईचा संघ होईल असे माजी इंग्लिश खेळाडूने म्हटले आहे. २०२० च्या हंगामात चेन्नईला पात्रता फेरी गाठण्यात अपयश आले होते. पण २०२१ मध्ये धोनीच्या संघाने शानदार पुनरागमन करून ट्रॉफी आपल्या नावावर केली. यंदाच्या हंगामात चेन्नईचे शिलेदार चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. सलामीवीर ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, डेव्हॉन कॉनवे आणि शिवम दुबे यांनी सीएसकेसाठी शानदार फलंदाजी केली, तर रवींद्र जडेजाने फिरकीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला चीतपट केले.
केकेआरविरूद्ध चेन्नईचा मोठा विजयईडन गार्डन्स कोलकाता येथे झालेल्या कालच्या सामन्यात चेन्नईने यजमानांना पराभवाची धूळ चारली. अजिंक्य रहाणेने केलेल्या स्फोटक खेळीच्या जोरावर सीएसकेने धावांचा डोंगर उभारला. रहाणेने २९ चेंडूत ७१ धावांची नाबाद खेळी केली. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ बाद २३५ धावा केल्या. २३६ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरचा संघ केवळ १८६ धावा करू शकला. शानदार अर्धशतकामुळे अजिंक्य रहाणेला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"