अॅडलेड: सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान अॅशेज सीरिज सुरू आहे. या सीरिजमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक वेळा नाबाद राहण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावे होताच, पण आता त्या विक्रमात त्याने मानाचा तुरा रोवला आहे. अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये 100 वेळा नाबाद राहण्याचा नवीन विक्रम केला आहे.
167 वा कसोटी सामना खेळणाऱ्या अँडरसनने अॅडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या अॅशेस सामन्यादरम्यान ही ऐतिहासिक कामगिरी केली. अॅडलेड कसोटीत ENG च्या पहिल्या डावात जेम्स अँडरसन 13 चेंडूत 5 धावा करुन नाबाद राहिला.
इशांत शर्मा टॉप 10 मध्ये अँडरसननंतर कसोटीत सर्वाधिक नाबाद राहण्याच्या बाबतीत दुसरे नाव वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज कर्टनी वॉल्स (61) यांचे आहे. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (56) तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा बॉब विल्स आपल्या कसोटी कारकिर्दीत 55 वेळा नाबाद राहिला होता. न्यूझीलंडच्या ख्रिस मार्टिनचे (52) नाव पाचव्या क्रमांकावर आहे. टॉप-5 मध्ये एकाही भारतीय खेळाडू नाही. इशांत शर्माचे नाव 8 व्या क्रमांकावर आहे, जो 47 वेळा नाबाद राहिला.
वेगवान गोलंदाज म्हणूनही आघाडीवर
जेम्स अँडरसनने आतापर्यंत 167 कसोटी सामन्यात 635 विकेट घेतल्या आहेत. अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा चौथा गोलंदाज आहे. याआधी सर्वाधिक विकेट घेणारे तीन स्पिनर आहेत. त्यामुळेच वेगवान गोलंदाज म्हणून सर्वाधिक कसोटी बळी घेण्याच्या बाबतीत अँडरसनचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.
इंग्लंडने पहिल्या डावात 236 धावा केल्या
ऑस्ट्रेलियाच्या 9 बाद 473 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव केवळ 236 धावांवर आटोपला. चौथ्या दिवसापर्यंत ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी 400 धावांपेक्षा जास्त आहे. या सामन्यात इंग्लंड सध्या पिछाडीवर आहे.