इंग्लंडचा १४६ वर्षांत कसोटीत सर्वांत लाजिरवाणा पराभव; न्यूझीलंडचा एका धावेने विजय

इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटच्या १४६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच संघाला फॉलोऑन देऊनही पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 05:37 AM2023-03-01T05:37:09+5:302023-03-01T05:37:30+5:30

whatsapp join usJoin us
England's most embarrassing Test defeat in 146 years; New Zealand win by one run | इंग्लंडचा १४६ वर्षांत कसोटीत सर्वांत लाजिरवाणा पराभव; न्यूझीलंडचा एका धावेने विजय

इंग्लंडचा १४६ वर्षांत कसोटीत सर्वांत लाजिरवाणा पराभव; न्यूझीलंडचा एका धावेने विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वेलिंग्टन : न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीत मंगळवारी इंग्लंडचा एका धावेने ऐतिहासिक  पराभव केला. त्याचबरोबर इंग्लंडचा १४६ वर्षांच्या कसोटी क्रिकेटमधील हा सर्वांत लाजिरवाणा पराभव ठरला. या विजयासह न्यूझीलंडने मालिकाही १-१ अशी बरोबरीत सोडविली. पराभवासह इंग्लंडच्या सलग सहा कसोटी विजयाची मालिका खंडित झाली, तर न्यूझीलंडने २०१७ नंतर घरच्या मैदानावर पराभूत होण्याची नामुष्की टाळली.

न्यूझीलंडने इंग्लंडसमोर विजयासाठी २५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते; परंतु त्यांचा दुसरा डाव २५६ धावांवर आटोपला. इंग्लंडकडून ज्यो रूटने सर्वाधिक ९५ धावांची खेळी केली;  पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. न्यूझीलंडच्या विजयाचे नायक नील वॅगनर आणि टीम साऊदी ठरले.  दोघांनी अनुक्रमे चार आणि तीन गडी बाद केले.

एका धावेने जिंकणारा दुसरा संघ
टीम साऊदीच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघ कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत कमी धावांनी सामना जिंकणारा जगातील दुसरा संघ ठरला. यापूर्वी १९९३ मध्ये ॲडिलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका धावेने विजय मिळवून वेस्ट इंडीजने हा विक्रम केला होता, तब्बल ३० वर्षांनंतर न्यूझीलंडने या यादीत आपली नोंद केली.

फॉलोऑन देत इंग्लंड प्रथमच पराभूत
इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटच्या १४६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच संघाला फॉलोऑन देऊनही पराभव पत्करावा लागला. सामन्यात इंग्लंडने पहिला डाव बाद ४३५ धावांवर घोषित केला. पाहुण्या संघाला येथे ५००-६०० धावा करण्याची मोठी संधी होती; कारण ज्यो रूट १५३ धावा केल्यानंतर क्रीजवर उपस्थित होता. मात्र स्टोक्सच्या आक्रमक विचारसरणीमुळे इंग्लंडने  पहिला डाव लवकर घोषित केला. न्यूझीलंडला २०९ धावांत गुंडाळून फॉलोऑन दिला. यानंतर न्यूझीलंडने ४८३ धावांपर्यंत मजल गाठून, २५८ धावांचे लक्ष्य दिले. इंग्लंड संघ केवळ २५६ धावा करू शकला.

अँडरसन पाहतच राहिला...
सामन्यात कधी इंग्लंड तर कधी न्यूझीलंडचा वरचष्मा जाणवत होता. इंग्लंड सामना सहज जिंकेल असे वाटत असताना न्यूझीलंडने बाजी मारली. विजयानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. जेम्स अँडरसन त्यांच्याकडे पाहतच राहिला. इंग्लंडची अखेरची जोडी मैदानात होती.  विजयासाठी केवळ ७ धावा हव्या होत्या.  ७ पैकी एक धाव जॅक लीचने काढली. अँडरसनने चौकार मारला. इंग्लंड जिंकेल असे मानले जात होते, नील वॅगनरने ऑनसाइड चेंडू टाकला. त्यावर अँडरसनला दोन धावा काढायच्या होत्या,पण चेंडूने बॅटची कड घेतली आणि  टॉम ब्लंडेलच्या हातात विसावताच अँडरसन झेलबाद झाला. यानंतर किवी संघाचा आनंद पाहण्यासारखा होता.

हा सामना कसोटी क्रिकेट कसे असावे याचे उत्तम उदाहरण आहे. शेवटच्या क्षणापर्यंत त्यात भावनांचा जोर कायम होता. मला वाटते, आज सगळ्यांचे पैसे वसूल झाले असतील. सामन्याचा शेवटचा अर्धा तास अप्रतिम होता. कसोटी क्रिकेटमधला अविश्वसनीय सामना होता. कधी कधी काही गोष्टी तुम्हाला पाहिजे तशा घडत नाहीत. ज्यो रूटने आमच्या विजयाची दारे उघडली होती, मात्र नील वॅगनर आणि टीम साऊदी यांनी ती बंद केली.’
 - बेन स्टोक्स, कर्णधार इंग्लंड


संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : पहिला डाव ८ बाद ४३५ वर घोषित. न्यूझीलंड : पहिला डाव : सर्वबाद २०९ (फाॅलोऑन), दुसरा डाव : सर्वबाद ४८३. इंग्लंड : दुसरा डाव ७४.२ षटकांत सर्वबाद २५६ (क्राऊली २४, बेन डकेट ३३, ज्यो रूट ९५, बेन स्टोक्स ३३, बेन फोक्स ३५, हॅरी ब्रूक धावबाद ००). गोलंदाजी : नील वॅगनर १५.२-०-६२-४, टीम साऊदी २०.१-५-४५-३, मॅट हेन्री २१.५-३-७५-२.

फॉलोऑननंतर जिंकणारा तिसरा संघ
फॉलोऑनमध्ये खेळूनही कसोटी जिंकणारा न्यूझीलंड तिसरा संघ ठरला. याआधी इंग्लंडने दोनदा असे विजय मिळविले तर भारताने एकदा अशी किमया साधली. २००१ ला भारताने ईडन गार्डनवर ऑस्ट्रेलियाचा १७१ धावांनी पराभव केला होता.

Web Title: England's most embarrassing Test defeat in 146 years; New Zealand win by one run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.