Join us  

ICC World Cup 2019 : इंग्लंड की न्यूझीलंड आज फैसला!

इंग्लंडने १९६६ ला फिफा फुटबॉल विश्वचषक जिंकला; पण क्रिकेटची त्यांची झोळी रिकामीच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 4:22 AM

Open in App

लंडन : क्रिकेट विश्वाला आज, रविवारी नवा विजेता मिळणार नाहे. आयसीसी विश्वचषकाचा अंतिम सामना लॉर्डस्वर या खेळाचा जन्मदाता यजमान इंग्लंड आणि नेहमी‘ अंडरडॉग’ मानला गेलेल्या न्यूझीलंड यांच्यात होणार असून, उभय संघ पहिल्या विजेतेपदासाठी उत्सुक आहेत.

इंग्लंडने १९६६ ला फिफा फुटबॉल विश्वचषक जिंकला; पण क्रिकेटची त्यांची झोळी रिकामीच आहे. महिला फुटबॉल संघालादेखील उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. इओन मोर्गनच्या नेतृत्वाखालील क्रिकेट संघाचा प्रवास चढ-उताराचा राहिला. तरीही हा संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पुढे आला आहे. फायनलसाठी सर्व रस्ते क्रिकेट मैदानाकडे वळतील, अशी स्थिती आहे. देशात पहिल्यांदा फुटबॉलची नव्हे, तर क्रिकेटची चर्चा होत आहे.

वन-डेत पहिल्यांदा इंग्लंडच्या कुण्या संघाने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. पहिल्या विश्वचषकात हा संघ पहिल्या फेरीत गारद झाला होता,पण त्या पराभवापासून प्रेरणा घेत या संघाने यंदा चक्क अंतिम फेरीत धडक दिली आहे. न्यूझीलंडकडे केन विलियम्सनसारखा ‘ कूल’ कर्णधार आहे. वेळोवेळी संघासाठी तो संकटमोचक ठरला. उपांत्य सामन्यात भारताला धूळ चारल्यानंतर हा संघ आणखी बलाढ्य बनला.

जॉनी बेयरेस्टो, जेसन रॉय, जोस बटलर आणि बेन स्टोक्स यासारख्या स्टार्सचा इंग्लंड संघ लॉर्डस्वर दावेदार वाटतो. १९७९, १९८७, १९९२ या वर्षांसारखे यंदा जेतेपद हातून निसटू नये याची काळजी या ‘टॉप’ फाईव्हना घ्यावी लागेल. १९७९ मध्ये इंग्लंड विंडीजविरुद्ध फायनल खेळला होता. १९८७ मध्ये कोलकाता येथील ईडन गार्डनवर अ‍ॅलन बॉर्डरच्या आॅस्ट्रेलियाने त्यांचा पराभव केला. १९९२ साली इम्रान खानच्या पाक संघाने पुन्हा इंग्लंडला जेतेपदापासून वंचित ठेवले होते.

यंदा जेसन रॉयने (४२६) आणि बेयरेस्टो (४९६) हे फॉर्ममध्ये आहेत. ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्री हे त्यांना कसे रोखतात हे पाहणे रंजक ठरणार आहे. ज्यो रुटने(५४९) मधल्या फळीला आकार दिला, तर स्टोक्स हा संतुलन निर्माण करतो. गोलंदाज जोफ्रा आर्चर याने १९ आणि ख्रिस व्होक्सने १३ गडी बाद केले. लियॉम प्लंकेटनेदेखील आठ फलंदाजांना बाद केले आहे. मागच्या विश्वचषकाचा अंतिम सामना खेळलेले सहा खेळाडू न्यूझीलंड संघात आहेत. विलियम्सनने ५४८, तर रॉस टेलरने ३३५ धावा केल्या आहेत. (वृत्तसंस्था)

महत्त्वाचेया स्पर्धेत आतापर्यंत इंग्लंडची धावगती ६.४३ अशी सर्वोच्च आहे, तर प्रती विकेट ४३.२६ धावा हे त्यांचे प्रमाणसुद्धा दुसरे सर्वाधिक आहे. याच्या उलट न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट हा ५.०१ असा सर्वोत्तम आणि त्यांच्या गोलंदाजांची सरासरी २७.१२ हीसुद्धा सर्वोत्तम आहे.भक्कम सलामी हा इंग्लंडसाठी फार मोठी जमेची बाजू आहे. गेल्या चार डावांत इंग्लंडसाठी जेसन रॉय व जॉनी बेयरस्टो यांनी १२८, १६०, १२३ आणि १२४ धावांची सलामी दिलेली आहे. याउलट न्यूझीलंडच्या डावाची सलामी १, २, २९, ५, ०, १२, ० अशी डळमळीतच झालेली आहे.दोन्ही संघांकडे प्रत्येकी दोन गोलंदाज असे आहेत ज्यांनी प्रत्येकी १५ पेक्षा अधिक बळी मिळविले आहेत.इंग्लंडच्या जो रूटने ५४९ धावा केल्या आहेत, तर न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने ५४८ धावा केल्या आहेत.न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोल्टने १७ व लॉकी फर्ग्युसनने १८ विकेट, तर इंग्लंडसाठी जोफ्रा आर्चरने १९ व मार्क वूडने १७ गडी बाद केले आहेत. फिरकी गोलंदाजांमध्ये आदिल रशिदच्या नावावर ११ बळी असले तरी त्याने ५.७९ च्या गतीने धावा दिल्या आहेत. याउलट न्यूझीलंडचा सँटनर सहा बळी घेताना ४.८७ धावा असा किफायती ठरला आहे.इंग्लंड विजयी१९७५ ८० धावांनी विजयी१९७९ ९ धावांनी विजयी१९८३ १०६ धावांनी विजयी२०१९ ११९ धावांनी विजयी

न्यूझीलंड विजयी१९८३ २ गड्यांनी विजयी१९९२ ७ गड्यांनी विजयी१९९६ ११ धावांनी विजयी२००७ ६ गड्यांनी विजयी२०१५ ८ गड्यांनी विजयी

उभय संघ यातून निवडणारइंग्लंड : इओन मोर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरेस्टो, जोस बटलर, टॉम कुरेन, लियॉम डॉसन, लियाम प्लंकेट, आदील राशिद, ज्यो रूट, जेसन राय, बेन स्टोक्स,जेम्स व्हिन्स, ख्रिस वोक्स, मार्क वूड.न्यूझीलंड : केन विलियम्सन(कर्णधार), मार्टिन गुप्तिल, कोलिन मुन्रो, रॉस टेलर, टॉम लाथम, टॉम ब्लंडेल, कोलिन डे ग्रॅन्डहोमे, जिम्मी नीशाम, ट्रेंट बोल्ट, लोकी फग्युर्सन, मॅट हेन्री, मिशेल सेंटनेर,हेन्री निकोल्स, टीम साऊदी आणि ईश सोढी.

 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019इंग्लंडन्यूझीलंड