इंडियन प्रीमिअर लीग २०२४ नंतर काही दिवसांतच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होणार आहे. त्यामुळे आयपीएल २०२४ साठी भारतात आलेल्या परदेशी खेळाडूंची पाऊले हळुहळू मायदेशाकडे वळत आहेत. इंग्लंडचे खेळाडू प्ले ऑफसाठी उपलब्ध नसतील हे आधीच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे. तरीही बीसीसीआयने त्यांना खेळाडूंना स्पर्धा होईपर्यंत खेळण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केल्याचे वृत्त आहे. अशातच इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर लिएम लिव्हिंगस्टन ( Liam Livingstone ) याने मायदेशात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
लिव्हिंगस्टन आयपीएल २०२४च्या प्लेऑफपूर्वी गुडघ्याच्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी आणि युनायटेड स्टेट्स आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी तंदुरुस्त होण्यासाठी मायदेशी परतला आहे. लिव्हिंगस्टन गेल्या काही वर्षांपासून स्नायूंच्या दुखापतींचा सामना करत आहे आणि या हंगामात सुरुवातीचे दोन सामने देखील तो खेळला नव्हता.
पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या लिव्हिंगस्टनने आयपीएल २०२४ च्या या मोसमात फक्त सात सामने खेळले आहेत आणि आता तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीसाठी इंग्लंडला परतला आहे. PBKS चे अजून दोन सामने बाकी आहेत. "आयपीएल आणखी एक पर्व पूर्ण झाले, आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी माझा गुडघा बरा करावा लागणार आहे. पंजाब किंग्जच्या चाहत्यांना त्यांच्या सर्व प्रेम आणि समर्थनासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. एक संघ म्हणून आणि वैयक्तिकरित्या हा निराशाजनक हंगाम राहिला." असे त्याने इंस्टाग्रामवर लिहिले.
पंजाब किंग्स हा प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणाऱ्या संघांपैकी एक आहे. त्यांचा कर्णधार शिखर धवनदेखील दुखापतीमुळे काही सामने खेळू शकला नाही.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी इंग्लंडचा प्राथमिक संघ - जॉस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टली, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लिएम लिव्हिंगस्टन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोप्ली, मार्क वुड
Web Title: England's star all-rounder Liam Livingstone has left IPL 2024 and returned to England to sort out his knee issue ahead of the T20 World Cup 2024.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.