काही दिवसांपूर्वीच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्ती घेतली. अशातच आता आणखी एका इंग्लिश गोलंदाजाने क्रिकेटला रामराम केले आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. २०१३ आणि २०१५ च्या ॲशेस मालिकेत फिन संघाचा भाग होता. यादरम्यान दोन्ही वेळा इंग्लंडचा विजय झाला होता. यासोबतच तो २०१० मध्ये ऑस्ट्रेलियन धरतीवर ॲशेस जिंकणाऱ्या संघाचाही तो हिस्सा होता.
निवृत्ती घेतल्यानंतर फिन म्हणाला की, आज मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. मागील १२ महिन्यांपासून मी माझ्या शरीरासाठी एक लढाई लढत आहे आणि आता मी हार मानली आहे. इंग्लंडसाठी ३६ कसोटी सामन्यांसह १२५ सामने खेळणे हे माझ्यासाठी एका स्वप्नासारखे होते. मी इंग्लंड, मिडलसेक्स आणि ससेक्सच्या शिलेदारांसोबत शेअर केलेल्या काही अद्भुत आठवणी घेऊन निवृत्त होत आहे. त्या आठवणी नेहमीच माझ्यासोबत असतील.
ब्रॉड पाठोपाठ स्टीव्हन फिनची निवृत्ती अलीकडेच पार पडलेली ॲशेस मालिका इंग्लंडचा दिग्गज स्टुअर्ट ब्रॉडसाठी शेवटची होती. ब्रॉडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. कसोटी क्रिकेटमधील एक यशस्वी गोलंदाज म्हणून ब्रॉडने आपला ठसा उमटवला. ब्रॉडने शेवटच्या सामन्यात ४ बळी घेतले. अशाप्रकारे १६७ सामन्यांत ६०४ बळी घेत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रवास थांबवला. इंग्लिश संघाच्या कसोटी संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून ब्रॉडकडे पाहिले जायचे. कसोटी सामन्यांव्यतिरिक्त स्टुअर्ट ब्रॉडने इंग्लंडकडून वन डे आणि ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. मात्र, ब्रॉड कसोटी क्रिकेटपटू म्हणून खूप यशस्वी ठरला. ब्रॉडने १६७ कसोटी सामन्यांमध्ये ६०४ बळी घेतले आहेत. तर, वन डेमधील १२१ सामन्यांमध्ये १७८ आणि ट्वेंटी-२० मधील ५६ सामन्यांमध्ये ६५ बळी घेण्यात इंग्लिश गोलंदाजाला यश आले.