Join us  

इंग्लंड प्रबळ दावेदार, पण भारत, ऑस्ट्रेलिया यांचा दावाही मजबूत

ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राने आगामी विश्वकप स्पर्धेत यजमान इंग्लंडला जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे,

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 3:47 AM

Open in App

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राने आगामी विश्वकप स्पर्धेत यजमान इंग्लंडला जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे, पण त्याचसोबत सध्याचा फॉर्म बघता भारत आणि आॅस्ट्रेलिया यांचा दावाही मजबूत असल्याचे सांगितले.आॅस्ट्रेलियाच्या २००७ च्या जेतेपदादरम्यान स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळवत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणाऱ्या मॅक्ग्राने अलीकडच्या कालावधीत झालेल्या एकदिवसीय सामन्यांतील कामगिरी बघता विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला पराभूत करणे सोपे नसल्याचे म्हटले. मॅक्ग्रा म्हणाला, ‘इंग्लंडचा संघ शानदार आहे. माझ्या मते या विश्वचषक स्पर्धेत ते प्रबळ दावेदार आहेत. ते या स्पर्धेत चांगली कामगिरी करतील.’मॅक्ग्रा पुढे म्हणाला, ‘मी माझ्या जीवनात कधीच भेदभाव करीत नाही. तुम्हाला वर्तमान कामगिरीचा विचार करावा लागेल. इंग्लंडच्या सध्याच्या कामगिरीमुळे मी प्रभावित झालो आहे. त्यांनी काही सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या उभारली आहे. अनेक संघ पहिल्या १५ व अखेरच्या १५ षटकांमध्ये वेगाने धावा फटकावतात आणि मधल्या षटकांमध्ये डाव मजबूत करण्याचा प्रयत्न करतात, पण इंग्लंड, भारत यासारखे संघ पूर्ण ५० षटके आक्रमक क्रिकेट खेळतात. येथेही टी२० चा प्रभाव आहे.’चेन्नई एमआरएफ पेस फाउंडेशनचा क्रिकेट संचालक मॅक्ग्राच्या मते भारत आणि आॅस्ट्रेलिया हे संघ इंग्लंडला कडवी लढत देण्यास सक्षम आहेत. इंग्लंड विश्वचषक जिंकेलच हे मी म्हणत नाही, पण ते प्रबळ दावेदार आहेत. मायदेशात त्यांना पराभूत करणे कठीण आहे, पण आॅस्ट्रेलिया चांगली कामगिरी करेल, अशी आशा आहे.’‘माझ्यासाठी दोन अनन्यसाधारण संघ भारत आणि इंग्लंड राहतील, पण आॅस्ट्रेलियाने चांगली कामगिरी करावी, अशी अपेक्षा आहे,’ असेही मॅक्ग्रा म्हणाला. (वृत्तसंस्था)